अभिनेते मनोज कुमार यांचे निधन   

चित्रपटांधून देशभक्तीची गोडी लावणारा ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे अभिनेते मनोजकुमार यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना 
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. उपकार, दो बदन, शहीद, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम यांसह त्यांचे विविध चित्रपट गाजले.
 
हरीकृष्ण गोस्वामी हे मनोजकुमार यांचे खरे नाव. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॅशन' या चित्रपटातून त्यांचे पडद्यावर आगमन झाले. हरियाली और रास्ता हा त्यांचा गाजलेला पहिला चित्रपट. शंकर जयकिशन यांच्या संगीताचा या चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोठा वाटा होता. यानंतर मनोजकुमार यांचे बहुतेक चित्रपट यशस्वी ठरले. वो कौन थी, गुमनाम, अनिता या रहस्यमय चित्रपटांचे ते नायक होते. साजन, आदमी , नीलकमल, रोटी कपडा और मकान असे त्यांचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. हुतात्मा भगतसिंग यांच्यावर आधारित 'शहीद' हा त्यांचा चित्रपट वाखाणला गेला. 'उपकार' हा देखील त्यांचा देशभक्तीपर चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. यामुळे भारतकुमार या नावाने मनोजकुमार ओळखले जाऊ लागले. 
 
आशा पारेख, साधना, नंदा, वहिदा रहमान या आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले आहे. उपकार, पूरब और पश्चिम यांसह अन्य चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती करून त्यांनी आपल्या अष्टपैलू प्रतिभेचा प्रत्यय दिला. दादासाहेब फाळके पुरस्काराने केंद्र सरकारने मनोजकुमार यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
 

Related Articles