सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के   

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर या तीन तालुक्यांमध्ये गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सांगोला तालुका भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळाली आहे. २.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी काही क्षणांसाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने याबाबत ट्विट केले आहे. भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. शिवाय नागरिकांनासुद्धा याची पुसटशी कल्पना आलेली नाही. मात्र राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनंतर सर्वांना सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत झालेला हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झालेला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. सांगोला हे भूकंपाचे प्रमुख केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सांगितले. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये मोठा भूकंप होऊन ३ हजाराहून नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे काही अंशी नागरिक भूकंप झाल्याचे ऐकून घाबरले आहेत.

Related Articles