मुस्लिम धर्मियांच्या जमिनीवर सरकारचा डोळा   

गौरव गोगोई यांचा आरोप

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना बदनाम व अधिकारहीन करण्याचा प्रयत्न आहे. एकप्रकारे हा राज्यघटनेवरील हल्ला आहे. सरकार धर्मात हस्तक्षेप का करत आहे? असा सवाल करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी राज्यघटना कमकुवत करणे, अल्पसंख्याकांना बदनाम करणे, त्यांचे अधिकार काढून घेणे आणि समाजात फूट पाडणे, हाच भाजपचा हेतू आहे, अशी टीका केली.
 
वक्फमधील प्रस्तावित बदलांना आमचा विरोध असल्याचे सांगत गोगोई यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. या विधेयकातून एका विशेष समुदायाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचे स्पष्ट होते. वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज नाही असे आम्ही म्हणत नाही; पण, या विधेयकामुळे अडचणी वाढतील आणि खटलेही! या विधेयकाचा उद्देश केवळ समस्या वाढवणे हा आहे, समस्या सोडवणे नाही. सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोगोई यांनी दावा केला की, या विधेयकामुळे समाजात वाद आणि फूट पडेल. जो समाज १८५७ मध्ये मंगल पांडे यांच्यासोबत लढला, ज्या समुदायाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्या समुदायाची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. हे तुमचे फोडा आणि राज्य करा धोरण आहे. आमच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजेच एकता, असेही गोगोई म्हणाले. या विधेयकाद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेवर हल्ला करण्याचा सरकारचा हेतु आहे. सरकार राज्यघटना कमकुवत करण्याचा, अल्पसंख्याक समुदायांची बदनामी करण्याचा, समाजात फूट पाडण्याचा आणि  संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे विधेयक केवळ एका समाजाच्या जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठी आणले असून भविष्यात इतर समाजाच्या जमिनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. २०२३ मध्ये संसदीय समितीच्या चार बैठकांमध्ये या विधेयकाचा उल्लेख केला नव्हता; पण अचानक त्यावर दुरुस्ती सादर केली. 

Related Articles