पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला   

भारतीय हद्दीत घुसखोरी; पूँछमध्ये स्फोटानंतर गोळीबार 

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांच्या तुकडीने भारतीय हद्दीत घुसखोरी करुन युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचे उघड झालेे. जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर स्फोटानंतर पाकिस्तानी  सैनिकांनी गोळीबारही केला आहे, अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली. मंगळवारी रात्री १ वाजून १० मिनिटांनी घुसखोरीची घटना घडली असून भारतीय सैन्याने चोख उत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली. चकमकीदरम्यान, पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू  झाला नसून एका स्फोटात  शत्रू राष्ट्राचे पाच सैनिक जखमी झाल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सीमेवर पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
 
जम्मू आणि काश्मीरच्या संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बरतवाल यांनी सांगितले की, एक एप्रिल रोजी सीमा पार करुन कृष्णा घाटी विभागात पाकिस्तानी सैनिक घुसले होते. तेव्हा स्फोट झाला. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून तुफानी गोळीबार करण्यात आला आणि युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याने चोख उत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे ते म्हणाले. नियंत्रण रेषेवर २०२१ पासून भारतीय जवान शांतता ठेवत आले आहेत. लष्करी कारवाईच्या महासंचालकांच्या आदेशानुसार तेथील तंबुनुमा  चौक्यांवर ते कार्यरत आहेत. २५ फेब्रुवारी २०२१ रोज दोन्ही देशांत युद्धबंदी करार झाला होता. त्यानुसार जम्मू आणि काश्मीर सीमेवर युद्धबंदी लागू आहे. पण, अशा प्रकारे करार मोडण्याची घटना दुर्मीळात दुर्मीळ असल्याचे ते महणाले.

Related Articles