श्री विजयपुरम : अंदमानातील प्रतिबंधित आदिवासी क्षेत्रात शिरलेल्या एका अमेरिकन नागरिकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. मिखायलो व्हिक्ट्रोवीच पॉलीकोव्ह (वय २४), असे त्याचे नाव आहे. दक्षिण अंदमानातील बंदी घातलेल्या आदिवासी बहुल त्रामगुली बेटात तो बेकायदा घुसला होता. ३१ मार्च रोजी त्याला अटक केली होती. २७ मार्च रोजी तो अंदमान निकोबरची राजधानी श्री विजयपुरम येथे आला होता. अंदमान आणि निकोबारचे पोलिस महासंचालक एच. एस. धालीवाल यांनी सांगितले, की, पॉलिकोव्ह हा अमेरिकन नागरिक असून त्याचे वडील युक्रेन वंशाचे आहेत. २९ मार्च रोजी खुरमदेरा समुद्र किनार्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो एका बोटीसह दिसून आला होता. आदिवासी भागात त्याचे येण्याचे कारण काय ? अंदमान आणि निकोबार बेटावर त्याने अन्य ठिकाणी भेटी दिल्या आहेत का ? तो कोणत्या हॉटेलमध्ये राहात होता, याचा तपास केला जात असून याबाबत कर्मचार्यांशी चौकशी केली जात आहे. तो २०२४ मध्येही अंदमान आणि निकोबारला आला होता. परदेशी कायद्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
Fans
Followers