वक्फ मंडळ म्हणजे काय?   

वक्फ हा अरबी शब्द आहे. वक्फ म्हणजे इस्लाम धर्म मानणार्‍या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेले दान. स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता वफ्फच्या कार्यक्षेत्रात येतात. वक्फसाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ मंडळ तयार करण्यात आले आहे. भारताच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमधील माहितीनुसार देशात एकूण ३० वक्फ मंडळे आहेत. दिल्लीत इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर भारतात वक्फ मालमत्तेमध्ये सातत्याने वाढ होत गेली. 
 
वक्फ कायदा कधी तयार झाला?
 
• ब्रिटिश राजवटीत १९२३ मध्ये वक्फचे नियमन करणारा पहिला कायदा लागू झाला. त्यावेळी त्याचे नाव ‘मुसलमान वक्फ कायदा-१९२३’ असे होते. स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये स्वतंत्र वक्फ कायदा करून केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली. १९९५ मध्ये नरसिंह राव सरकारने १९५४ चा कायदा रद्द करत नवीन वक्फ कायदा मंजूर केला, ज्यामुळे वक्फ मंडळाला व्यापक अधिकार दिले गेले.
 
वक्फ विधेयक काय आहे? 
 
• वक्फ सुधारणा विधेयक २०२४ हे वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करणारे विधेयक आहे. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन, पारदर्शकता आणि गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारला हे विधेयक लागू करायचे आहे. बुधवारी केंद्र सरकारने ते लोकसभेत मांडले. त्यावर आठ तास वादळी चर्चा झाली. 
 
विधेयकामागचा सरकारचा हेतू काय? 
 
• वक्फ मालमत्तेच्या नियंत्रण आणि देखरेखीच्या संदर्भातील अडचणी सोडवणे हा या विधेयकामागचा सरकारचा उद्देश आहे. भारतात सध्या वक्फ संपत्तीचे कामकाज वक्फ अधिनियम १९९५ नुसार केले जाते. केंद्रीय वक्फ परिषद सरकार आणि राज्य वक्फ मंडळाला धोरणांसंदर्भात मार्गदर्शन करते; परंतु, वक्फ मालमत्तांना थेट नियंत्रित करत नाही. राज्य वक्फ मंडळ प्रत्येक राज्यातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम करते.  
 
विधेयकातील मुख्य सुधारणा कोणत्या?
 
• गैर-मुस्लिम आणि महिला सदस्यांचा वक्फ मंडळात समावेश करणे, जिल्हाधिकार्‍यांना मालमत्तेची पाहणी करण्याचा अधिकार देणे, वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तरतूद, अशा ४० दुरूस्त्या या विधेयकात प्रस्तावित आहेत.  
 
वक्फ मंडळाकडे किती मालमत्ता आहे?
 
• सप्टेंबर २०२४ मध्ये सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वक्फ  मंडळाकडे संपूर्ण भारतात ९.४ लाख एकर जागा आहे. त्यापैकी ८.७ लाख एकर मालमत्तेवर वक्फ मंडळाचे थेट नियंत्रण आहे. या मालमत्तेची किंमत १.२ लाख कोटी असल्याचे सांगितले जाते. २००९ पर्यंत वक्फ बोर्डाकडे ४ लाख एकर जमीन होती. जी काही वर्षांतच दुप्पट झाली. वक्फ मंडळाकडे बहुतेक मदरसे, मशिदी आणि कब्रस्तानच्या जमिनी आहेत. भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ मंडळाकडे सर्वाधिक जमीन आहे. 
 
वक्फ मंडळ कोणत्या मालमत्तेवर दावा करू शकते? 
 
• धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित असलेल्या मालमत्तांवरच वक्फ मंडळ दावा करू शकते. कोणत्याही खासगी मालमत्तेवर वक्फ मंडळ दावा करू शकत नाही. वक्फ मंडळाला कोणत्याची मालमत्तेची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. वक्फ मंडळाने एखाद्या मालमत्तेवर दावा केला तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही. त्यासाठी वक्फ न्यायाधिकरणाकडे अपिल करावे लागेल. 

Related Articles