अवकाळीने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला   

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुढील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोल्यात सलग दुसर्‍या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकर्‍याला याचा मोठा फटका बसला आहे. बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावात कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे पीक काढणी करून कापण्यासाठी ठेवण्यात आले होते; परंतु या पावसामुळे हातातोंडाशी आलेला कांदा पाण्याने भिजला. यात जवळपास हजारो क्विंटलचे नुकसान झाले आहे. 
 
वादळी वार्‍यासह झालेल्या या पावसामुळे अनेक केळी उत्पादक शेतकर्‍यांचेही नुकसान झाले आहे. वार्‍यामुळे केळीची झाडे पडल्याने केळीचे घड अक्षरश: पावसात भिजून खराब झाले. यात शेतकर्‍यांचे एकरी जवळपास ३५ ते ४० टक्के  नुकसान झाले आहे. अवघ्या दोन दिवसांवर कापण्यास आलेली केळी वाया गेली आहेत. अवकाळीचा फटका बसल्याने शेतकर्‍यांकडे व्यापार्‍यांनी पाठ फिरवली आहे. जनावरांनाही फटका या अवकाळी पावसाचा तडाखा जनावरांना बसला आहे. या पावसात शेतकर्‍यांच्या मेंढ्या भिजल्याने आजारी पडल्या आहेत. त्यामुळे मेंढापालन करणारे शेतकरी चिंतेत पडले आहेत.
 
रब्बी पिकांना फटका
 
जालन्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात काढणीस आलेला गहू आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील शेवगळ आणि परिसरात सकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने गहू आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Articles