भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त   

पणजी : भारतीय नौदलाच्या ’आयएनएस तर्कष’ या पश्चिम कमांड अंतर्गत कार्यरत असणार्‍या या युद्धनौकेने हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रातील गस्तीदरम्यान दोन हजार ५०० किलोचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ही या वर्षातील मोठी कार्यवाही आहे.
 
जानेवारीमध्ये सागरी सुरक्षेसाठी हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेली ’आयएनएस तर्कष’ ही युद्धनौका ’संयुक्त कृती दल १५०’ या पथकाला मदत करते. हा संयुक्त सागरी सुरक्षा दलाचा एक भाग असून, त्याचा तळ बहारिनमध्ये आहे. ही युद्धनौका ऍन्झॅक टायगर या बहुराष्ट्रीय संयुक्त उद्देश लष्करी मोहीमेत सहभागी झाली होती. 
 
३१ मार्च रोजी गस्तीवर असताना आयएनएस या युद्धनौकेला पी ८१ या भारतीय नौदलाच्या विमानाकडून त्या भागातील संशयास्पद नौकांची माहिती मिळाली. या नौका अंमली पदार्थांचा चोरट्या व्यापारासह अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तर्कष युद्धनौकेने आपला मार्ग बदलून संशयास्पद नौकांच्या मार्ग आडविला.
 
आसपासच्या सर्व संशयित नौकांची कायदेशीर चौकशी केल्यानंतर मुंबईतील सागरी कारवाई केंद्र आणि पी-८१ विमानाच्या समन्वयाने तर्कषवरील अधिकार्‍यांनी एका संशयित नौकेवर प्रवेश केला. याशिवाय तर्कषवरील हेलिकॉप्टरद्वारे संशयास्पद नौकांवरील हालचालींवर देखरेख ठेवण्यात आली व त्या भागातील आणखी अशाच संशयास्पद नौकांचा शोध घेण्यात आला. सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर दाखल होऊन शोधमोहीम राबवली. यामध्ये विविध बंद पाकिटे आढळली. 
 
पुढील तपासात या नौकांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या कप्प्यांत दोन हजार ५०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ (२३८६ किलो हशीश व १२१ किलो हेरोइन) सापडले. या नौकेवर आयएनएस तर्कष युद्धनौकेने यशस्वीरित्या ताबा मिळविला. नौकेवरील कर्मचार्‍यांची त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तसेच त्या भागात असलेल्या अन्य नौकांबाबत सखोल चौकशी केली.

Related Articles