‘वक्फ’ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही   

मुंबई, (प्रतिनिधी) : वक्फ दुरुस्ती विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कोणाच्याही आस्थेला ठेच पोहचविणारे नाही. तर, भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील धर्मनिरपेक्षता या सुधारणा विधेयकातून प्रतिबिंबित होत आहे. वक्फ सुधारणा विधेयक आणून सरकारने अतिशय प्रागतिक आणि पुरोगामी पाऊल टाकले आहे. त्यामुळे ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत आहे अशी प्रत्येक व्यक्ती या सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
 
मुळ वक्फ कायद्यात वक्फ मंडळाला  अमर्याद अधिकार बहाल करण्यात आले होते. एखादा चुकीचा निर्णय झाल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याचीही मुभा नव्हती. दुरुस्ती विधेयकाने या जुन्या चुका सुधारण्याची तरतूद  निर्माण होणार आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकातून अनेक चुकीच्या बाबींना पायबंद बसणार आहे. यापूर्वीच्या कायद्यामुळे गावेच्या गावे किंवा अनेकांच्या जमिनी वक्फमध्ये दाखवून त्या लाटल्या जात होत्या. जमिनी काढण्याचे हे प्रकार दुरुस्ती विधेयकामुळे थांबणार असल्याचेही फडणवीस  म्हणाले.
 
१०० दिवसांच्या कृती आरखड्याची प्रभावी अंमलबजावणी
 
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात १०० दिवसांच्या विभाग निहाय कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी २६ विभागांचे मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित होते. १००  दिवसांच्या आरखड्यात ९३८ कृतीबिंदूवर काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार, ४११ कामे पूर्ण झाली असून ३७२ कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर केवळ १५५ कामे अर्थात १६ टक्के मुद्दयांवर काम बाकी आहेत. त्यासाठी विभागांना १५ दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला असून १ मे पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील,  असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काल २६ विभागांचा आढावा घेतला असून आज (गुरूवारी- २२ विभागांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles