समाजकंटकांपासून दूर राहा   

बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांचा सल्ला

बीड : आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा आणि गुन्हेगारी घटकांपासून दूर राहा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. बीडमध्ये अनेक टोळ्या आहेत. यात वाळू टोळी, राख टोळी, भूखंड टोळी आदींचा समावेश आहे. मात्र, या सर्व टोळ्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारादेखील पवार यांनी यावेळी दिला.
 
बीड जिल्ह्यातील लोकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सांगतानाच पवार यांनी मराठवाड्यातील (बीडसह) आठ जिल्ह्यांमध्ये फारसा विकास झालेला नाही, अशी कबुली दिली.  बीडची प्रतिमा मलीन करण्याचे आणि जातीय विभाजन निर्माण करण्याचे प्रयत्न आपल्याला रोखावे लागतील. बीड जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणावे लागेल, असेही ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ८० टक्के समाजकार्य आणि २० टक्के राजकारण करावे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणात अटक झाली आहे. विरोधी पक्षाच्या दबावानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडे हे परळीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, कालच्या कार्यक्रमास ते उपस्थित नव्हते. वैद्यकीय उपचारांसाठी आपण मुंबईत असल्याचे मुंडे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles