शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले   

इंदापूर,(वार्ताहर) : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असणार्‍या शिरसोडी ते कुगाव या नियोजित पुलाची संलग्न असणारा ४५० मीटरचा भरावा आजच्या घडीला शिरसोडीकरांच्या असंतोषाचे कारण बनला आहे. शिरसोडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारपासून भराव्याचे काम बंद पाडले आहे.
 
कसल्या ही परिस्थितीत हा भरावा आम्ही होवू देणार नाही. रक्तपात होण्याची, पोलीस ठाण्यात जाण्याची अथवा आत्महत्या पाळी आली तरी आमची तयारी आहे, असा निर्धार व्यक्त करत, भराव्याऐवजी नदीच्या पाण्याच्या कडेपर्यंत पूल करण्यात यावा, अशी मागणी शिरसोडीकरांनी लावून धरली आहे.
शिरसोडी गावचे सरपंच राजेंद्र चोरमले, इंदापूर खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब चोरमले व इतर ग्रामस्थांनी मंगळवारी शिरसोडी येथील भराव्याच्या ठिकाणाजवळ पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
यावेळी बोलताना सरपंच राजेंद्र चोरमले व भाऊसाहेब चोरमले म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा हा पूल होणे ही बाब अतिशय चांगली आहे. इंदापूर, करमाळ्याचे दळणवळण त्यामुळे वाढणार आहे. पुलाच्या कामाला आमचा विरोध नाही. तो प्राधान्याने झाला पाहिजे. मात्र पुलाच्या कामात ४५० मीटरच्या भराव्याचे जे काम आहे. ते आमच्या दृष्टीकोनातून अडचणीचे ठरणार आहे.
 
या भागात शेतकर्‍यांची सुमारे शंभर एकर शेती आहे. ज्यावेळी पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्यावेळी भरावा होणार असलेल्या भागात ते दूरवर पसरते. त्याचा उपयोग आमच्या पिकांना होतो. पाळीव जनावरांची तहान भागते.भरावा झाल्यावर कोणत्या ही शेतकर्‍याला नदीपर्यंत जाता येणार नाही. जनावरे चारण्यासाठी अडचणी येणार आहेत. पाणी ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस कितीतरी दिवस ते पाणी भरावयाला अडकून रहाणार आहे. आमच्या पिकांसाठी हे नुकसानकारक ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
आम्ही उजनी धरणासाठी आमच्या जमिनी दिल्या. आत्ता भराव्याच्या रुपाने आमच्या राहिलेल्या जमिनीवर नवे संकट येवू घातले आहे. ते आमच्या पिढ्यानपिढ्यासाठी कायमचे अडचणीचे ठरणार आहे. जीव गुदमरुन टाकणारा हा भरावा होवूच नये. त्या ऐवजी नदीच्या पाण्याच्या कडेपर्यंत पूल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे,असे त्यांनी सांगितले.  या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व इतर संबंधितांना आम्ही निवेदने दिली आहेत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

Related Articles