जेजुरीत भेसळयुक्त भंडारा नको, मंत्र्यांना साकडे   

जेजुरी, (वार्ताहर) :  जेजुरी देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, पत्रकार प्रकाश फाळके यांनी शुक्रवारी मुंबई येथे अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. हळद आणि कुंकू यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. भेसळयुक्त भंडारा हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेत उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले.कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक जत्रा-यात्रा उत्सवामध्ये भंडारा आणि खोबरे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 
 
राज्यातून येणारा भाविकभक्त येथे दाखल होत मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो. देवाच्या चरणी अर्पण करतो. तळीभंडारा, जागरण गोंधळ-कोटांबा पूजन-लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करत हा भंडारा कपाळी लावतो. प्रसाद म्हणून भाविक भक्षणही करतो. काही भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर देवघरात ठेवून पावित्र्य जपतो. या सोनपिवळ्या भंडार्‍यामुळेच सोन्याची जेजुरी हे नाव प्रचलित झाले आहे. मंगल कार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या भंडार्‍याला भेसळीचे ग्रहण लागले असून पिपळेे पावडर,नॉन एडीबल ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडाराजत्रा यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या भंडार्‍यामुळे त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडार्‍याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून ही समस्या आहे.

Related Articles