औंध बसस्थानकाचे उद्घाटन   

पीएमपी बससेवा सुरू 

पुणे : वाहतूक कोंडीमुळे या मार्गांवरील पीएमपीच्या नियोजित फेर्‍या पूर्ण होणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असायची. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून नव्या औंध बसस्थानकाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध जकात नाक्याची जागा या बसस्थानकाला देण्यात आली असून या बसस्थानकातून आता पीएमपी बससेवा सुरू करण्यात आली आहे. 
  
या नव्या बसस्थानकाचे उद्घाटन शिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशी बससेवा पुरविण्यात येत असते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध या भागातून नव्याने बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसस्थानकातून बसमार्ग क्र. ३४ औंध ते मुकाई चौक रावेत, बसमार्ग क्र. १२४ औंध ते निलसॉफ्ट कंपनी हिंजवडी फेज ३ आणि बसमार्ग क्र. ३६० औंध ते आळंदी हे नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. औंध बसस्थानकातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles