समाजवादी ही राजकीय विचारधारा नसून तो जीवन प्रवाह   

डॉ. तारा भवाळकर यांचे प्रतिपादन 

पुणे : समाजवादी विचार ही केवळ राजकीय घोषणा नाही. समाजवादी विचार म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे, त्याचा बारकाव्याने विचार आणि आचार करण्याची यंत्रणा आहे. ती नुसती राजकीय विचारधारा नसून तो एक जीवन प्रवाह आहे, असे मत लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
 
समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाई वैद्य फाऊंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अभिजित वैद्य, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, लक्ष्मीकांत मुंदडा उपस्थित होते.
 
डॉ. भवाळकर म्हणाल्या, भाई वैद्य हा एक जोडणारा विचार आहे. या विचाराने अनेक संघटना आणि विचारधारा जोडल्या गेल्या आणि हा परिवार मोठा होत गेला. भाईंचे जगणे हे आदर्शवादी होते. भाईनी शेवटच्या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठे काम  केले. आज जर भाई वैद्य असते तर कदाचित त्यांनी फार वेगळी चळवळ उभी केली असती. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी शालेय शिक्षण हक्कासाठी कायम लढा दिला. 
 
डॉ. बाबा आढाव म्हणाले, सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य करणार्‍या डॉ. तारा भवाळकर यांना भाई वैद्य यांच्या नावाचा पुरस्कार दिला गेला, ही अतिशय उचित गोष्ट आहे. सध्याचे वातावरण हे लोकशाही विरोधी आणि नागरी हक्कांवर गदा आणणारे आहे. अशा परिस्थितीत केवळ याविरोधात बोलणे पुरेसे ठरणार नसून समविचारी व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन कृती करणे आवश्यक आहे. 
 
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ब्रिटीशांनी महात्मा गांधींना आंदोलने करू दिली. आंदोलनानंतर ते गांधीजींना अटक करयचे, पण सध्याच्या काळात स्वतंत्र भारतात आंदोलन करण्याची परवानगी सुद्धा नाकारली जाते, अशी परिस्थिती आहे. ही लोकशाहीची गळचेपी आहे. ही दडपशाही कलावंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत आहे, ही गंभीर बाब आहे. भाई वैद्य यांनी मांडलेला केजी टू पीजी मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे.  डॉ. अभिजीत वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. अतुल रूणवाल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गीतांजली वैद्य यांनी तारा भवाळकर यांचा परिचय करून दिला. 

Related Articles