निसर्गाच्या सानिध्यात राहणार्‍या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ   

पुणे : निसर्गाच्या सानिध्यात राहणार्‍या लोकांमुळे निसर्गाचा विध्वंस होतो, अशी अंधश्रद्धा आपल्याकडे आहे. त्यावर शहरी लोक परिसंवाद घेतात. मात्र, विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर प्रचंड बोजा टाकतो आहोत, हे आपण विसरून जातो आणि निसर्गात राहणार्‍या लोकांना दोष देतो. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात राहून, त्याच्याशी एकरूप झालेल्या लोकांमुळे निसर्गाचा समतोल राखला जात आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.
 
पुण्यातील ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना पहिला ’एआयबीडीएफ गोंदण पुरस्कार’ डॉ. गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित सोहळ्यात निवेदक प्रवीण जोशी यांनी डॉ. आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेतली. प्रसंगी माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले, ’एआयबीडीएफ’चे संस्थापक विश्वस्त अशोककुमार सुरतवाला, डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे उपस्थित होते.
 
डॉ. गाडगीळ म्हणाले, वाघांची संख्या वाढली आहे. ते पोटासाठी शिकार शोधत असतात. त्यांना माणसे सापडतात. माणसांनी निसर्गात अतिक्रमण केले आहे. काही हजार वर्षापूर्वी हत्ती, वाघ जंगलात राहत होते. त्यांच्या रहिवासावर सर्वांनीच अतिक्रमण केले आहे. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, त्वचेच्या आजाराचे दुःख इतरांना कळत नाही. कुष्ठरोग्यांशी जवळून संबंध आले. सहा रुग्णापासून सहा हजारपर्यंत रुग्ण झाले. हातापायांना बोटे नसलेल्या माणसांनाही बाबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले.
 
डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, लोकांचा फार विचार न करता चांगले आयुष्य जगणे हेच तारुण्य आहे. आपण करत असलेल्या कामातून मिळणारा आनंद हेच सुखी आयुष्य आहे.  डॉ. शरद मुतालिक, डॉ. सुनील वर्तक यांनी मनोगत व्यक्त केले. अशोककुमार सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध बंबावाले यांनी आभार मानले. 

Related Articles