धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी   

महापालिकेकडून समाविष्ट गावे वार्‍यावर; महिनाभरापासून गैरसोय

पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना समस्येचे ग्रहण लागले आहे. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे आणि कोपरेगावातील नागरिकांना मागील महिना भरापासून महापालिकेकडून अपुरे पाणी मिळत आहे. परिणामी रोज टँकर मागविण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. धरण उशाशी आणि गावे उपाशी अशी काहीशी स्थिती या चार गावांची झाली आहे. 
 
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून या चार गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने परिसरातील सोसायट्यांना रोज टँकर मागवावा लागत आहे. मागणी वाढल्यामुळे दिवसेंदिवस खासगी टँकरचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वाढलेल्या दराचा आर्थिक भुर्दंड या परिसरातील सोसायट्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोंढवे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महापालिकेने १४ कोटी देऊन पाण्याची टाकी हस्तांतरित करून घेतली आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत ही टाकी अपुरी असल्याने महिनाभरापासून शिवणे, उत्तमनगर, कोंढवे आणि कोपरे या चार गावात पाणी टंचाई जाणवत आहे. 
 
महिनाभरापासून शिवणे, कोंढवे, कोपरेगाव आणि उत्तमनगर या गावांतील नागरिक पाणी टंचाईचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आतापासूनच एका टँकरचा दर १००० ते १२०० रूपये झाला आहे. येत्या काळात हा दर २००० पर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आणखी दोन महिने येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागणार आहे. एकीकडे या चारही भागांतील नागरिक महापालिकेला दरवर्षी कर भरतात. मात्र महापालिकेकडून या भागांना गरजेनुसार पाण्याचा पुरवठा होत नसल्याने कर भरून पाणीही विकत घेण्याची वेळ या चार गावांतील नागरिकांवर आली आहे. 
 
शिवणे आणि उत्तमनगर ही दोन गावे २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली, तर २०२० मध्ये कोंढवे व कोपरे गाव महापालिकेत आले. गावे महापालिकेत आली, मात्र या गावांना महापालिकेकडून अद्यापही कोणत्याच सोयीसुविधा पुरविण्यात येत नसल्याने या गावातील नागरिक महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त करत आहेत. पाण्यासह या चार गावांत उद्यान, महापालिका रूग्णालयाची समस्या आहे. एकच रस्ता असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. ड्रेनेज लाइनसह कचर्‍याचा प्रश्नही येथील नागरिकांना भेडसावत आहे. 
 
गावांचा खेळखंडोबा झाला
 
आमची गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात एकही सुविधा पुरविण्यात आली नाही. सद्य:स्थितीत शिवणे, उत्तमनगर, कोंढवे आणि कोपरे गावात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. महापालिकेने या गावांतील नागरिकांसाठी कर आकारणी सुरू केली. मात्र त्या कराच्या मोबदल्यात सुविधा मात्र शून्य दिल्या. त्यामुळे येथील नागरिकांना रोजच पाण्याच्या प्रश्नावर झगडावे लागत आहे. अनेक सोसायट्यांना टँकरचे पाणी सुरू झाले आहे.
- सुरेश गुर्जर, सामाजिक कार्यकर्ते, उत्तमनगर.
 
चारही भागांत स्वतंत्र टाक्या उभारा
 
शिवणे, उत्तमनगर, कोंढवे आणि कोपरे गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोंढवे आणि कोपरेगावात ज्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. त्या टाक्यांची क्षमता वाढविण्यात यावी. तसेच शिवणे आणि उत्तमनगरसाठी स्वतंत्र ५० लाख लीटर क्षमतेच्या टाक्या उभारण्यात याव्यात अशी मागणी आम्ही सातत्याने महापालिका आणि राज्य सरकारकडे करत आहोत. तसेच ज्या भागात पाणी कमी पडत आहे. त्या भागात पाइप लाइन वाढवाव्यात. आदी मागण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे.  
- अतुल दांगट, सामाजिक कार्यकर्ते, शिवणे.
 
नियोजनाचा अभाव 
 
शिवणे, उत्तमनगर, कोंढवे आणि कोपरेगावासाठी जी पाण्याची टाकी उपलब्ध आहे. ती येथील लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाण्याचे वितरणाबाबत नियोजन करणे अपेक्षित आहे. दोन गावांना सकाळी, तर दोन गावांना सायंकाळी पाणी सोडता येऊ शकते. मात्र एकाच वेळी चारही गावांना पाणी सोडले जात असल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. पावसाळ्याला अद्याप खूप अवधी असल्याने प्रशासनाने पाण्याच्या वितरणाचे नियोजन करणे नितांत गरजेचे आहे.
- कुणाल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते, शिवणे. 

Related Articles