‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण   

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी १०० वा प्रयोग

पुणे : अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांचा ’नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम शंभरीत पदार्पण करत आहे. या कार्यक्रमाचा १०० वा प्रयोग येत्या सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता, कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. अतुल अरुण दाते व मॅजेस्टिक लँडमार्क्स यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रसिकांसाठी उपलब्ध असतील अशी माहिती अतुल दाते यांनी दिली.
 
‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, पल्लवी पारगांवकर व वर्षा जोशी हे प्रमुख गायक कलाकार सहभागी होणार आहेत. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते हे वडिलांच्या विविध आठवणींना दृकश्राव्य माध्यम व संवादातून उजाळा देणार आहेत. मंदार आपटे हे प्रसिद्ध गायक व संगीतकार आहेत. ‘ती सध्या काय करते’ या लोकप्रिय चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आपटे यांनी केले आहे. तर पल्लवी पारगांवकर या प्रसिध्द गायिका असून वर्षा जोशी या जागतिक भावगीत स्पर्धेच्या विजेत्या आहेत. नवा शुक्रतारा कार्यक्रमाची संकल्पना अतुल दाते यांची असून ते स्वतः या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. 

Related Articles