कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल   

महापालिका उचलणार खर्च  

पुणे: शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः कोथरूड, पौड रस्ता आणि चांदणी चौक या भागांमध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा बोजा जाणवतो. याच पार्श्वभूमीवर पुणे मनपा आणि महामेट्रोकडून पुणेकरांसाठी दिलासा दिला जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणासोबतच आता कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर एक नवा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा दुमजली उड्डाणपूल पौड रस्त्यावर कचरा डेपो-टीवीएस शो-रूम पासून लोहिया आयटी पार्कपर्यंत उभारण्यात येणार असून, महामेट्रोने याबाबतचा आराखडा पुणे महापालिकेला सादर केला आहे. सदर प्रकल्पासाठी अंदाजे ९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 
 
कोथरूड हा पुण्याचा पश्चिम प्रवेशद्वार असून, इथे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. कोथरूड डेपो परिसर, नळस्टॉप, लोहिया आयटी पार्क या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याशिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती आणि दोन प्रमुख सिग्नल तसेच ८ ते ९ छोटे चौक आहेत. केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावरही मोठा वेळ वाया जातो. या रस्त्याचा वापर कोकण, मुंबई तसेच हिंजवडी भागात जाण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे मोठी रहदारी असते. या उड्डाणपुलाच्या माध्यमातून वाहनांची सततची गर्दी कमी होण्याची शक्यता असून, कोथरूड डेपो समोरील वाहतूक कोंडी कायमची सुटण्याची आशा आहे. हा पूल नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे.
 
दुमजली पुलावर सर्वांत वर मेट्रो धावणार असून त्याखालील पुलावरून वाहने धावणार आहेत. शहरातील मेट्रो जाळ्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वनाज ते रामवाडी मार्गाचा चांदणी चौक पर्यंत विस्तार हा पश्चिम पुण्याच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गाचा प्रस्ताव केंद्राकडे असून अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या मार्गाला मंजूरी मिळाल्यानंतर उड्डाणपुलाचे कार्य देखील लगेच सुरू होईल.
शहरातील तिसरा दुमजली उड्डाणपुल
 
मेट्रोसाठी याआधी शहरात दुमजली पुल बनविण्यात आले आहेत. त्यातील नळस्टॉप येथे महामेट्रो ने उड्डाणपुल बनविला आहे. पुणे विद्यापीठ चौकामध्ये देखील दुमजली पुलाचा काम सुरू आहे. या दोन्ही पुलांवर सर्वांत वर मेट्रो धावणार असून त्याखालील पुल वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. या दोन दुमजली पुलांनंतर आता पौड रस्त्यावर शहरातील तिसरा दुमजली उड्डाणपुल बनविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
 
आराखड्यावर अभ्यास करून पुढील कार्यवाही 
 
महामेट्रोने पौड रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचा आराखडा बनविला असून तो मनपाला मिळाला आहे. अत्यंत रहदारीच्या या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे. प्रमुख २ सिग्नल, पीएमपी डेपो यातून नागरिकांची सुटका होणार आहे. या आराखड्यावर मनपा तर्फे अभ्यास करून अपेक्षित बदल किंवा सूचना सांगितल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार. पुलाचा खर्च पालिकेतर्फे केला जाणार आहे.
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, पुणे मनपा
 
एकूण लांबी - ७१५ मीटर
रूंदी - १४ मीटर (प्रत्येकी २-२  लेन)
अंदाजे खर्च - ९० कोटी रुपये

Related Articles