‘घिबली’ आर्ट काय आहे?   

सध्या समाजमाध्यमावर घिबली आर्ट अ‍ॅनिमेशनने धुमाकूळ घातला आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत आणि अभिनेत्यांपासून राजकारण्यांना भुरळ पाडणारे हे घिबली अ‍ॅनिमेशन नेमके काय आहे? त्याचे निर्माते कोण? हे आपण जाणून घेऊ...
 
घिबली आर्ट काय आहे?
 
घिबली ही जपानी अ‍ॅनिमेशन शैली आहे. ओपन-एआय चॅटजीपीटीच्या नवीन अपडेटद्वारे किंवा ग्रोक या टूलद्वारे वापरकर्त्यांना त्यांची छायाचित्रे ‘घिबली’ या कार्टून शैलीत जादुई थीमसह करून घेता येतात. घिबली हा शब्द इटालियन शब्दापासून घेण्यात आला आहे. घिबली म्हणजे सहारा वाळवंटातील गरम वारा असा त्याचा अर्थ होतो. घिबली शैलीतील छायाचित्रांची मोठी लाट सध्या समाजमाध्यमावर पसरली आहे. 
 
निर्माते कोण?
 
घिबली अ‍ॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे. घिबली हा जपानमधील एक स्टुडिओ असून, हायाओ मियाझाकी हे त्याचे संस्थापक आहेत. मियाझाकी यांना जपानी अ‍ॅनिमेशनच्या जगातील बादशाह मानले जाते. त्यांनी जवळपास २५ पेक्षा अधिक अ‍ॅनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका तयार केल्या आहेत. ‘स्पिरिटेड अवे’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात २३ हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या घिबली शैलीचे संपूर्ण श्रेय मियाझाकी आणि त्यांच्या स्टुडिओला जाते. 
 
मियाझाकी यांची संपत्ती किती?
 
मियाझाकी यांच्या एकूण संपत्तीचा कोणताही अचूक अंदाज नाही.  प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती जवळपास ५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ४२८ कोटी आहे. घिबली स्टुडिओच्या प्रोडक्ट्स आणि स्ट्रीमिंग अधिकारांमुळे मियाझाकी यांची संपत्ती झपाट्याने वाढली. 
 
घिबली कशी बनवायची
 
प्रथम चॅटजीपीटीवर जा. प्रॉम्प्ट बारवरील थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करा.
त्यानंतर इमेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॅनव्हास ऑप्शन दिसेल. त्यावेळी तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रतिमा हवी आहे, याबद्दल मजकूर लिहा आणि तुमचे  छायाचित्र अपलोड करा. ‘वॉन्ट घिबली स्टाइल फोटो’ असे लिहिल्यावर तुमचे  छायाचित्र घिबली स्टाईलमध्ये बदलले जाईल.
 
योग्य उच्चार कोणता?
 
घिबली शब्दाचा उच्चार जपानी आणि इटालियन भाषेत वेगळा आहे. जपानी भाषेत ‘जी’ चा उच्चार ‘जे’ केला जातो आणि ‘एल’ चा उच्चार ‘आर’ असा केला जातो. त्यामुळे जपानी भाषेत याला ‘जिबुरी’ तर इटालियन भाषेत ‘गिब्ली’  म्हटले जाते. भारतात इंग्रजी अक्षरांनुसार त्याचा उच्चार ‘घिबली’ असा होतो. 

Related Articles