विघ्नेश, मुंबई इंडियन्सचा नवा चेहरा   

बदलते क्रीडा विश्व, शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

युवा खेळाडूतील गुणवत्ता हेरणे, खेळाडू लिलावात त्याला कमी किमतीत खरेदी करणे, त्याला घडविणे      आणि योग्य वेळी सामन्यात खेळण्याची संधी देणे, या गोष्टी मुंबई इंडियन्सला ’आयपीएल’मधील इतर फ्रँचायझींपेक्षा वेगळे ठरवतात. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, तिलक वर्मा... या आणि अशा अनेक युवा खेळाडूंना मुंबईने ’आयपीएल’चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आता या यादीत चायनामन फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथुरचे नावही जोडले गेले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटचा कोणताही अनुभव नसताना विघ्नेशला मुंबई इंडियन्सने संधी दिली. त्याने या संधीचे सोने करताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ’आयपीएल’ पदार्पणात चार षटकांत ३२ धावांत तीन बळी मिळवले. 
 
मुंबई संघाची ’आयपीएल’मधील सलामीचा सामना गमाविण्याची मालिका सलग १३व्या हंगामातही कायम राहिली. मात्र, मुंबईचा पराभव किंवा चेन्नईच्या विजयापेक्षा, २४ वर्षीय विघ्नेशच्या कामगिरीचीच क्रिकेटविश्वात आणि समाजमाध्यमांवर अधिक चर्चा रंगली. विघ्नेश केरळच्या मलप्पुरमचा रहिवासी. वडील रिक्षाचालक आणि आई गृहिणी. अतिशय सामान्य घरातून आलेल्या विघ्नेशने अद्याप वरिष्ठ स्तरावर देशांतर्गत क्रिकेट खेळलेले नाही. केरळ क्रिकेट लीग आणि तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये काही सामने खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ’स्काउट्स’ चे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याला निवड चाचणी शिबिरात बोलाविण्यात आले. यात त्याने मुंबईच्या व्यवस्थापनाला प्रभावित केले. .
 
चेन्नईविरुद्धच्या विघ्नेशने केलेल्या ’कामगिरीने महेंद्रसिंह धोनीही प्रभावित झाला. सामन्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी धोनीने विघ्नेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शाबासकी दिली. मला इतक्या नामांकित खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळेल असा मी कधी विचारही केला नव्हता असे विघ्नेश म्हणाला. केरळच्या पेरिंथलमन्ना येथील पीटीएम महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात ’एमए’ च्या पदवीसाठी अभ्यास करत असलेल्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये यशस्वी विघ्नेशने आता पाऊल टाकले आहे. आता तो आणखी किती उंची गाठतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
लिलावानंतर लगेचच विघ्नेशला खेळाडू म्हणून अधिक परिपक्व घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याला विविध प्रशिक्षकांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली. तसेच त्याला मुंबई इंडियन्सच्या केंद्रावर सरावासाठी बोलाविण्यात आले. मोठ्या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी विघ्नेशला दक्षिण आफ्रिकेतील ’एसए ट्वेन्टी२०’ लीगमध्ये पाठविण्यात आले. यात त्याने मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या केपटाऊन संघाबरोबर महिनाभर सराव केला. मायदेशी परतल्यावर विघ्नेशने मुंबई संघातील रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारख्या नामांकित फलंदाजांविरुद्ध नेट्समध्ये गोलंदाजी केली. या प्रत्येकाला त्याच्याविरुद्ध खेळताना अडचण आली. त्यांनी विघ्नेशबाबत सकारात्मक गोष्टी सांगितल्याने मुंबईच्या संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास वाढला.

Related Articles