बागंलादेशला मुजफ्फरनगरच्या गुळाची गोडी!   

वृत्तवेध 

भारत आणि बांगलादेशमधील संबंध विकोपाला गेले असले, तरी उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथून शेजारच्या बांगलादेशमध्ये ३० टन ‘जीआय टॅग’ गुळाची निर्यात करण्यात आली आहे. आशियातील गुळाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुजफ्फरनगर प्रसिद्ध आहे.
 
मुजफ्फरनगरच्या गूळ बाजारात दर वर्षी लाखो टन गुळाची खरेदी-विक्री होते. येथील गुळाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही रसायनाचा वापर न करता बनवला जातो. त्यामुळे नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतो. शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपन्यां (एफपीसी)मार्फत पश्चिम उत्तर प्रदेशमधून बांगलादेशमध्ये गुळाची थेट निर्यात होते. ‘बासमती एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ (बीईडीएफ) आणि ‘अपेडा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही खेप रवाना करण्यात आली. जागतिक बाजारपेठेत कृषी क्षेत्राला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. बृजनंदन अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी (एफपीसी) मध्ये दोन महिला संचालकांसह ५४५ सदस्य आहेत. हा ‘एफपीओ’ गूळ, ऊस उत्पादने, बासमती तांदूळ आणि डाळींच्या निर्यातीसाठी सक्रिय आहे. ‘बीईडीएफ’कडून मिळालेल्या प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्यामुळे त्याचे सदस्य आंतरराष्ट्रीय उत्पादन आणि निर्यात मानकांची पूर्तता करण्यास सक्षम झाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या ‘एफपीओ’ची कृषी निर्यातीत ‘अपेडा’च्या पाठिंब्याने ही तिसरी यशोगाथा आहे. यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये ‘नीर आदर्श ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’द्वारे लेबनॉन आणि ओमानला बासमती तांदूळ निर्यात करण्यात आला होता.
 
भौगोलिक संकेत किंवा ‘जीआय टॅग’ कोणत्याही वस्तू किंवा उत्पादनासाठी विशेष मानले जातात. हा टॅग सरकारकडून विशिष्ट गुणवत्तेसाठी किंवा वैशिष्ट्यासाठी ओळखल्या जाणार्‍या वस्तूला दिला जातो. अयोध्येतील हनुमान गढीचे बेसन लाडू, ओडिशाची लाल मुंगीची चटणी, राजस्थानची दाल बाटी चुरमा किंवा कोलकात्याची मिष्टी डोई ही उत्पादने जीआय टॅगद्वारे ओळखली जातात.‘जीआय टॅग’ मिळाल्यानंतर त्या वस्तूचे मूल्य अनेक पटींनी वाढते. भारताचा वारसा भारतातच जतन करण्यासाठी २००३ मध्ये ‘जीआय’ टॅगची सुरुवात करण्यात आली. भारताने जागतिक व्यापार संघटनेशी करार केला. इतर अनेक देशही भारतीय वस्तूंची नक्कल करून चढ्या भावाने विकतील, असा धोका होता. यामुळे भारताचे आर्थिक नुकसान होईल आणि संस्कृतीवरही नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे ‘जीआय टॅग’ लागू करण्यात आला.

Related Articles