गुजरातमध्ये फटाक्याच्या गोदामात स्फोट   

१८ ठार; ५ जखमी

पालनपूर, (गुजरात) : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात मंगळवारी फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट झाला. यामध्ये १८ कामगार ठार झाले असून ५ जखमी झाले आहेत. डीसा शहराजवळील औद्योगिक परिसरात सकाळी ९.४५ वाजता ही घटना घडली. स्फोटानंतर इमारतीचा छत कोसळला, अशी माहिती असे पोलिस अधीक्षक अक्षयराज मकवाना यांनी दिली.या स्फोटात मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार मध्य प्रदेशातील होते. स्लॅब कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला, असेही ते म्हणाले. प्रारंगी फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला, असे वृत्त होते. मात्र, या ठिकाणी फटाक्यांची केवळ साठवणूक केली जात होती; निर्मिती केली जात नसे, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
 
या घटनेवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या वारसांना चार लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर तातडीने योग्य उपचार व्हावेत, अशी सूचनादेखील त्यांनी केली आहे.मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मध्यप्रदेश सरकार गुजरातच्या अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात आहे. या दुर्घटनेत बाधित झालेल्या कामगारांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे ते म्हणाले.स्फोटावेळी कामगार गोदामात होते. अचानक स्फोट झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. हा स्फोट इतका भीषण होता की अनेक कामगारांच्या शरीराचे भाग दूरवर फेकले गेले. काही भाग शेतात आढळून आले. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच, अथक परिश्रम करत आग आटोक्यात आणली. मात्र, तत्पूर्वीच १८ कामगारांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी दिली.

Related Articles