महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन   

नवसारी : महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारिख यांचे गुजरातमधल्या नवसारी या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. नीलमबेन ९२ वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्यातल्या मतभेदांवर नीलमबेन पारिख यांनी एक पुस्तक लिहिले होते त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
 
दक्षिणपथ आदिवासी महिलांच्या उद्धारासाठी नीलमबेन यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या आदिवासी महिलांना स्वावलंबन शिकवणे, शिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्यांनी केले. हरिलाल गांधी आणि त्यांच्या पत्नी गुलाब यांना पाच मुले होती. त्यापैकी रामीबेन यांची कन्या म्हणजे नीलमबेन. नीलमबेन या त्यांच्या खादीवरील निष्ठेसाठीही ओळखल्या जात होत्या. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले, अशी माहिती नीलमबेन यांचे चिरंजीव डॉ. समीर पारिख यांनी दिली.
 
माझ्या आईला कोणताही आजार नव्हता. गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे तिने जेवण जवळपास सोडून दिले होते. तिला ऑस्टिओपोरोसिस होता. त्यामुळे तिची हाडे ठिसूळ झाली होती. या एका कारणामुळे मी तिला रुग्णालयात न नेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मी तिच्याजवळ बसून होतो. तिच्या नाडीचे ठोके हळूहळू मंदावले, त्यानंतर हळूहळू कुठलीही वेदना किंवा त्रास न होता तिने प्राण सोडले, अशी माहिती समीर पारेख यांनी दिली. आमच्यावर गांधी विचारधारा आईने कधीही लादली नाही. मात्र तिचे आयुष्य पाहून आम्ही सगळेच प्रभावित झालो होतो, असेही माहिती समीर पारिख यांनी दिली.

Related Articles