यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस   

ढोकसांगवीत पर्जन्यमानाचे आढीवाचन

रांजणगाव, (वार्ताहर) : हिंदू वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र पंचांग पुजन करण्यात येते. पंचांग वाचन करुन पुढील वर्षभराच्या परिस्थितीचा अंदाज व्यक्त केला जातो. ढोकसांगवी येथे आढी वाचनाची परंपरा आहे. या आढी वाचनानुसार दोन नक्षत्र सोडून सर्व नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच धनधान्याचे देखील चांगले उत्पन्न होणार असल्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षीचे वातावरण हे कडधान्यासाठी चांगले असेल, असे ग्रामपुरोहित चंद्रकांत श्रीमंत यांनी सांगितले.
 
ढोकसांगवी, (ता. शिरुर) येथील महादेव मंदिरात पारंपारिक प्रथेप्रमाणे सर्व ग्रामस्थ जमले होते. जमिनीमध्ये खोलगट आढ्या बनवून द्रोणात सर्व प्रकारचे धान्य मांडण्यात आले होते. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुरोहित चंद्रकांत श्रीमंत व देवाचे पुजारी शरद गुरव यांनी त्या आढ्या उघडल्या. धान्याच्या ओलसरपणाच्या अंदाजावरुन त्या पिकाची स्थिती उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली. आढी पुजन व पंचांग वाचन ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडले. देवाची आरती पोलिस पाटील दिपक मलगुंडे यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर आढी पुजन करण्यात आले. दरम्यान, कारेगाव, रांजणगाव गणपती, बाभूळसर खुर्द, निमगाव भोगी, सोनेसांगवी, खंडाळे, पिंपरी दुमाला, वाघाळे, वरुडे व सरदवाडी येथेही गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Articles