डोक्यात दगड घालून शेतकर्‍याचा खून   

लोणी काळभोर, (वार्ताहर) : घराच्या अंगणात खाटेवर झोपलेल्या एका शेतकर्‍याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून, मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. 
 
रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५  रा. वडाळे वस्ती, टाकेचा माळ, रायवाडी रोड, लोणी काळभोर) असे  खून झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. रवींद्र काळभोर हे लोणी काळभोर येथील वडाले वस्ती येथे कुटुंबासोबत राहत होते. काळभोर हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काळभोर हे घराच्या अंगणातील खाटेवर झोपत होते. दरम्यान, काळभोर हे नेहमीप्रमाणे सोमवारी (३१ मार्च) रोजी रात्री खाटेवर झोपले होते. मंगळवारी सकाळी काळभोर यांना उठविण्यासाठी आवाज दिला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घरच्यांनी खाटेजवळ जाऊन पहिले असता, काळभोर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाल्याचे दिसून आले.
 
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार चंद्रथर शिरगिरे, प्रदीप गाडे, सूरज कुंभार, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Related Articles