’पीएमपी’च्या बसमध्ये महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय   

पुणेे : स्वारगेट एसटी बसस्थानक तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शाळांमधील विद्यार्थिनींची ने-आण करणार्‍या पीएमपीच्या बसमध्ये आता महिला सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
यासाठी महापालिकेच्या अंदाज पत्रकात तरतूद केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु अद्याप या प्रस्तावाला आयुक्तांकडून मान्यता देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा रक्षकांची आपुरे पडत असल्याने सुरक्षा विभागाने ४०० कंत्राटी कर्मचार्‍यांची मागणी केली. या मागणीला मान्यता मिळाल्याशिवाय पीएमपी बसला सुरक्षा रक्षक देणे शक्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले.  
 
पुणे महापालिकेच्या शहरात १९ शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या ‘पीएमपी’ची बस सेवा आहे. या बससेवेतून विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची सेवा दिली जाते. या सेवेदरम्यान मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव ४८ बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुणे महापालिकेच्या शाळेत बसने येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेकडून सुरक्षा रक्षक दिले जाणार आहेत. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये केली जाणार आहे. या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक असणार आहेत. परंतु सध्या महापालिकेकडे सुरक्षा रक्षकांचे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यात ४८ बससाठी महिला सुरक्षा रक्षक नेमायच्या असतील तर त्यासाठी नव्याने कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करावी लागणार आहे. शाळेची वेळ बघून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी लागणार आहे.
 
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या स्कूल बस, तसेच स्कूल व्हॅनमध्ये महिला सहाय्यक असतात, मात्र महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या बसमध्ये महिला सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळे महापालिकेने विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी पीएमपीएलच्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याच्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम पीएमपीएलच्या सुमारे ४८ बसच्या माध्यमातून केले जाते. महिला सुरक्षारक्षकांसाठी महापालिका प्रशासनाकडून शिक्षण विभागाबरोबर चर्चा केली आहे. त्यानुसार या सुरक्षा रक्षकांची सेवा देण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा महापालिकेचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या पीएमपी बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमल्या जाणार आहेत.
 
पुणे महापालिकेसह मालमत्तांची सुरक्षा करण्यासाठी १५६५ कर्मचार्‍यांचा तसचे २७५ कायम कर्मचार्‍यांचा ताफा कार्यरत आहे. परंतु सध्या असलेले कर्मचारी आपुरे पडत असल्याने आणखी ४०० कंत्राटी कर्मचार्‍यांची मागणी करण्यात आली. आपुर्‍या सुरक्षा रक्षकांमुळे ताण वाढला आहे. त्यात सुरक्षा रक्षकांची मागणी वाढत असल्याने त्याचा पुरवठा कसा करायचा असा प्रश्न सुरक्षा विभागाकडे आहे. सुरक्षा विभागाने ४०० कंत्राटी कर्मचार्‍यांची मागणी केली आहे. त्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दोन वेळा बैठक घेतली आहे. त्या बैठकीत किमान २०० तरी कंत्राटी कर्मचारी नेमावेत यावर चर्चा झाली आहे, मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. 
 
सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर महिला सुरक्षा रक्षक नेमावे लागणार आहेत. त्यामुळे मागणी मान्य झाल्यास सुरक्षा रक्षक नेमता येईल. सध्या असलेल्या १५६५ कंत्राटी कर्मचार्‍यांचे कंत्राट डिसेंबर २०२४ मध्ये संपले आहे. त्याला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. ही मुदत देखिल ३१ मार्चला संपली आहे. त्याला आणखी एक महिन्याची मुदत वाढ मागण्यात आली आहे. नव्याने कंत्राटी टेंडर राबविताना १५६५ मध्ये मान्यता मिळाल्या ४०० अधिकच्या कर्मचार्‍यांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाईल. असे सुरक्षा विभागाने सांगितले.    
 
महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे बळ
 
•१५६५ (कंत्राटी कर्मचारी)
• २७५ कायम कर्मचारी  
• यातील ६० टक्के पुरुष कर्मचारी, तर महिला ४० टक्के
• २५ तृतीय पंथीय सुरक्षा रक्षक असून आणखी २५ ची नेमणूक करणार  
• आणखी ४०० सुरक्षा रक्षकांसाठी कंत्राटी कर्मचार्‍यांची केली मागणी

Related Articles