राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी प्रकल्प राबवणार   

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती 

पिंपरी : शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीचे अनुदान बंद केले असले तरी राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.
  
मुळातच पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत चे अनुदान सहा महिने आधी वापरले आहे. यापुढेही राज्य व केंद्राच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्मार्ट सिटी अंतर्गत कामे केली जातील असे आयुक्तांनी सांगितले.स्मार्ट सिटी अंतर्गत  सायकल शेअरिंग  प्रकल्पासारखे काही प्रकल्प महापालिकेने आधीच गुंडाळले असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आयुक्त सिंह म्हणाले की , सायकल शेअरिंग हा पूर्वीच राबवलेला प्रकल्प आहे.पण सगळेच प्रकल्प गुंडाळले असे म्हणता येणार नाही काही पुढे मागे झाले असतील. एखादा प्रकल्प यशस्वी होत नाही म्हणून नवीन काही करायचेच नाही हे चुकीचे आहे शिकून पुढे जायला हवे असे आयुक्त सिंह म्हणाले.
 
शिकून पुढे जायला हवे असे आपण म्हणता मात्र प्रकल्प अयशस्वी झाल्यानंतर त्यावर झालेल्या खर्चाचे काय असे पत्रकारांनी विचारले असता तेवढे मात्र सोसावे लागते असे आयुक्त सिंह म्हणाले.आमदार अमित गोरखे यांनी अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट तर आमदार शंकर जगताप यांनी वृक्ष गणनेच्या कामासंदर्भात प्रशासनावर टीकास्त्र सोडले. गोरखे यांनी तर आयुक्तांचा अधिकार्‍यांवर व ठेकेदारांवर वचक नसल्याने चुकीची कामे होत असल्याचा आरोप केला होता  याकडे लक्ष वेधले असता आयुक्त सिंह यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना बोलण्याचा हक्क आहे असे ते म्हणाले.

Related Articles