केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठीची ८२ कोटींची निविदा रद्द करा   

मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी :भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी काढण्यात आलेली  ८२ कोटींची निविदा रद्द करावी. या प्रकरणाची  चौकशी करून दोषी भ्रष्ट अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
   
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील टेल्को रस्त्यावरील भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्ययावत पध्दतीने विकसित करणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने मार्गिका, वाहनतळ, सायकल ट्रॅक, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शौचालय उभारणार आहे. या कामासाठी तब्बल ८१ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५६ रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम धनेश्वर क्रन्स्ट्रक्शनला देण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी महापालिका कर्ज काढणार आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवटीत ऋण  काढून सण साजरे करण्याचे प्रकार सुरू आहे. 
 
पिंपरी पालिकेतील काही अधिकारी, सल्लागार संगनमत करून विशिष्ट अटी शर्ती कोट्यावधीचा मलिदा लाटून राजकीय वरदहस्त असणाऱ-या ठेकेदारांनाच कामे देतात. हे  अधिकारी संबंधित ठेकेदाराला संपूर्ण निविदा प्रक्रियेची अगोदरच माहिती देतात, दर निश्चिती करतात, रिंग घडून आणतात, निविदा भरताना काही ठेकेदारांना दमदाटी करतात, स्पर्धा झाल्याचा आभास निर्माण करतात व महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालतात. विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांचा  चुराडा सुरू आहे. महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार करून सुशोभीकरण केले जात आहे. या कामासाठी सुमारे दीडशे कोटी रूपयांचा खर्च केला आहे. एकीकडे महापालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना प्रशासन अर्बन स्ट्रीटसारखा संकल्पना राबवत आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक होणार आहे.
 
शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यांपैकी एक महत्वाचा रस्ता आहे. केसबी चौकापासून इंद्रायणीनगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलो मीटर अंतराचा आहे. त्यापैकी गवळी माथा ते इंद्रायणी नगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा अद्यावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. यांची नियुक्ती केली. रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले. या सर्वेक्षणात सध्यःस्थितीतील सहा पदरी रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले. त्यासाठी हा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन केले. त्यानुसार ९० कोटी ६५ लाख ७७ हजार ४५५ रूपयांची निविदा प्रसिध्द केली. यामध्ये केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला. 
 
दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही मे. धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन आणि अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर या दोनच ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरली. त्यानंतर पालिकेने ११ टक्के कमी दराची धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा स्विकारली. त्यांच्याकडून ८१ कोटी ७७ लाख ५५ हजार ५५६ रूपयांमध्ये काम करून घेण्यास आयुक्तांनी  मान्यता दिली आहे.मे. धनेश्वर कंट्रक्शन प्रा.लि. हा ठेकेदार राजकीय हितसंबंधातील असून महापालिकेची बहुतांशी मोठ्या रकमेचे कामे  त्यालाच कामे मिळतात. या ठेकेदाराला हे काम देताना महापालिका प्रशासनातील अधिकारी या संगनमतात सामील असतात. ते संबंधित ठेकेदारांना आगाऊ माहिती पुरवतात, त्यातून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतात. इतर ठेकेदारांना स्पर्धेत भाग घेऊ दिले जात  नाही,  रिंग करतात. यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे 

Related Articles