वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा   

नवी दिल्ली: भारतीय महिला हॉकी संघाची दमदार खेळाडू वंदना कटारियाने मंगळवार, १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. वंदनाने  २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली. २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारतीय संघाचाही ती भाग होती. ३२ वर्षीय वंदना ऑलिंपिकमध्ये हॅटट्रिक करणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला बनली आणि क्रीडाविश्वात विक्रमी कामगिरी केली. 
 
ती ३२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसह भारतीय महिला हॉकीमध्ये सर्वाधिक कॅप्ड खेळाडू आहे आणि या सामन्यांमध्ये तिने १५८ गोल केले आहेत. तिच्या जवळपास १५ वर्षांच्या कारकिर्दीत, कटारियाने २ ऑलिंपिक खेळ (रिओ २०१६, टोकियो २०२०), २ FIH महिला हॉकी विश्वचषक (२०१८, २०२२), ३ राष्ट्रकुल खेळ (२०१४, २०१८, २०२२) आणि ३ आशियाई खेळ (२०१४, २०१८, २०२२) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अशाप्रकारे, तिने राष्ट्रीय संघात महत्त्वाची भूमिका बजावली, स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यास मदत केली. ३२ वर्षीय कटारियाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१६, २०२३) आणि FIH हॉकी महिला नेशन्स कप (२०२२) मध्ये भारताच्या सुवर्णपदक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धा, २०१३ च्या जपानमधील महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१८ च्या डोन्हे येथील महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संघातही महत्त्वाची भूमिका बजावली.
 
निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना वंदना म्हणाली की, 'हा निर्णय सोपा नव्हता पण मला माहित आहे की ही योग्य वेळ आहे.' मला आठवते तेव्हापासून हॉकी माझे जीवन आहे आणि भारतीय जर्सी घालणे हा माझा सर्वात मोठा सन्मान होता. पण प्रत्येक प्रवासाचा स्वतःचा मार्ग असतो आणि मी हा प्रवास खेळाबद्दल प्रचंड अभिमान, कृतज्ञता आणि प्रेमाने सोडत आहे. भारतीय हॉकी चांगल्या हातात आहे आणि मी नेहमीच त्याचा सर्वात मोठी समर्थक राहीन.

Related Articles