न्याय विभागाकडून स्वारगेट प्रकरणाची अद्याप चौकशी नाही   

यंत्रणेवर प्रश्नचिन्ह 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून पुणे पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली होती. पत्र लिहून सहा दिवस झाले आहेत. मात्र, न्याय विभागाकडून संबंधित यंत्रणेची साधी विचारपूस व चौकशी देखील करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात पीडितेला खरचं न्याय मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २५ फेबु्रवारी रोजी तरुणीवर आरोपी दत्ता गाडे याने अत्याचार केला. सध्या गाडे हा न्यायालयीन कोठडीत आहे. 
या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पीडिताने नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच, पुणे पोलिस, न्यायालय आणि राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना आपल्यावर कसा अन्याय झाला, याबाबत पत्र लिहून तपास यंत्रणा आणि न्यायालय यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. 
 
या प्रकरणात वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तरुणीने प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, वैद्यकीय चाचणीच्या वेळी तिच्या इच्छेविरूध्द पुरूष वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली. घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर चौकशी दरम्यान तिला अनेक पुरूष पोलीस अधिकार्‍यांसमोर अत्याचाराच्या घटनाचे तपशीलावर वारंवार वर्णन करावे लागले, याकडे पीडितेने पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. मात्र, विधी व न्याय विभागाकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया पुढे आली नाही. त्यामुळे विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Related Articles