आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप   

पुणे : एखादा व्यावसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन व्हावे, या उद्देशाने पर्णकुटी व सह्याद्री हॉस्पिटलच्या पुढाकाराने उपेक्षित समुदायातील महिलांना व्यवसाय स्टार्टअप किटचे वितरण करण्यात आले. उपेक्षित समुदायातील ६० महिलांनी या किटस्चा लाभ घेतला. यामध्ये १० शिवणयंत्रे, ११ मेकअप किट आणि ९ ब्युटी पार्लर किटचा समावेश होता. पर्णकुटीतर्फे यासोबतच अल्प उत्पन्न गटातील महिला, स्थलांतरित आणि एकल माता अशा ६० महिलांना नेल आर्ट कोर्स, ऍडवान्सड हेअर कटिंग कोर्स व डिजिटल पोर्टफोलिओ बिल्डिंग या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लोनटॅप कंपनीचे विराज आणि पर्णकुटीच्या संस्थापक स्नेहा भारती उपस्थित होते. 
 
या उपक्रमात स्नेहा भारती यांनी आर्थिक सशक्तीकरण आणि कौशल्य विकासाच्या गरजेवर अधिक भर दिला. स्नेहा भारती म्हणाल्या, पर्णकुटी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महिलांसाठी संधी निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. व्यवसाय स्टार्टअप किट म्हणजे केवळ साधने नाहीत, तर उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे. लोनटॅपचे विराज यांनी देखील वित्तीय संधी आणि उद्योजकतेवरील आपले विचार मांडले. लाभार्थ्यांना या किट्सचा प्रभावीपणे उपयोग करून स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा सल्ला दिला. पर्णकुटी व्यावसायिक प्रशिक्षण आणि संसाधन वितरणाद्वारे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी कार्यरत आहे. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या उदार मदतीमुळे हा उपक्रम पर्णकुटीच्या शाश्वत परिवर्तनाच्या ध्येयात आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Related Articles