मोदी यांच्या उत्तराधिकार्‍याबाबत चर्चेची गरज नाही   

फडणवीस यांनी राऊत यांना ठणकावले

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या नेतृत्वात बदल करु इच्छितो. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नागपूरचा दौरा केला होता. मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातील असेल, असे अनुमान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले आहे. त्यांचे अनुमान आणि दावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी खोडून काढले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उत्तराधिकार्‍याबाबत कोणतीही चर्चा करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला नुकतीच भेट दिली. त्या द्वारे मोदी  २०२९ मध्ये निवृत्त होत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे अनुमान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले आहे.  त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.
 
मोदी यांच्या नागपूर दौर्‍याच्या विषयावर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाच्या नेतृत्वात बदल हवा आहे. त्यामुळे बहुधा पंतप्रधान मोदी हे सप्टेंबरमध्ये निवृत्त होण्यासाठीं लेखी अर्ज करण्यासाठी नागपूर दौर्‍यावर आले होते. यापूर्वी भाजपमधील अनेक नेत्यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त करण्यात आले होते. मोदी देखील सप्टेंबरमध्येे ७५ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत.  संजय राऊत यांचा दावा खोडून काढताना फडणवीस म्हणाले, की, मोदी यांच्या उत्तराधिकार्‍याचा शोध घेण्याची आणि त्याबाबत चर्चा करण्याची तूर्त गरज नाही. कारण मोदी सध्या सक्रिय असून पंतप्रधान पदावर कार्यरत आहेेत. ते २०२९ नंतरही पंतप्रधान पदावर कार्यरत राहतील. उत्तराधिकार्‍याबाबतची चर्चा भारतीय संस्कृतीला धरुनही नाही. आपल्या संस्कृतीत वडील हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण ? अशी चर्चा कधीच केली जात नाही. मात्र, मुघल संस्कृतीत तशी केली जात होती, 
 
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातील असेल, या राऊत यांच्या दाव्याबाबत नागपूर येथे संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश भय्याजी यांनी पत्रकारांना सांगितले की, तशी कोणतीही चर्चा झाल्याची मला माहिती नाही.  मोदी यांनी डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. तसेच कार्यक्रमही छान झाला. कोरोना काळातील सेवेबाबत मोदी यांनी रूची दाखविली. मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रिमीयम सेंटरचा शिलान्यास झाला. स्वयंसेवक नात्याने त्यांनी रेशीमबागेतील हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. दरम्यान, संघाचे मुख्यालय महाल परिसरात असून रेशीमबागेत संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांचे स्मारक आहे. 
 
दोन्ही ठिकाणे संघासाठी पवित्र मानली जातात. पंतप्रधानपदावर असताना अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट दिली. 

कबरीच्या उदात्तीकरणाला परवानगी नाही 

मुघल बादशाह औरंगजेब नागरिकांना आवडो किंवा न आवडो. पण, त्याची  कबर संरक्षित स्मारक आहे. मात्र, कबरीच्या उदात्तीकरणास परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केले. 
 
कायदाच्या कक्षेबाहेरील संररचना काढून टाकल्या पाहिजेत, असे सांगताना ते म्हणाले, औरंगजेब आवडो किंवा न आवडो; पण कबर संरक्षित स्मारक आहे. मात्र, कबरीच्या उदात्तीकरणाला परवानगी दिली जाणार नाही. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची खुल्ताबाद येथील कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात विश्व हिंदू परिषदेने याच मागणीसाठी नागपूर येथे आंदोलन केले होते. तेव्हा पवित्र चादर जाळल्याची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. 
 

Related Articles