महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे   

व्यंग्यचित्रकार फडणीस यांचे प्रतिपादन 

पिंपरी : महाराष्ट्रात नाटक, कला, संगीत, साहित्य रुजले. यासोबतच आता चित्रकला रुजत आहे. याचा मला आंनद आहे, असे उदगार ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि.द. फडणीस यांनी काढले.
 
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टस् अँड क्राफ्ट्सच्या वतीने फडणीस यांना डॉ. डी. वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या आकृती वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर अ‍ॅडमिरल अमित विक्रम, प्राचार्य जयप्रकाश कलवले, समन्वयक प्रा. शंकर आडेराव, जनरल सेक्रेटरी आयेशा शेख आदी उपस्थित होते.
 
फडणीस म्हणाले, चित्रकारांच्या रेषा बोलतात त्यामुळे साहित्यात चित्राला स्थान मिळाले. व्यंग्य चित्रातून विनोद निर्मिती होते. मी केवळ छंद म्हणून चित्रकला जोपासायची असे ठरवले होते. नंतर मात्र या कलेचे समर्थ्य ओळखले. यातील विविध छटा असून निखळ आनंद देणारी कला आहे. यामुळे मी यात रमलो. हस्तकलेची वाट चित्रकलेतून जाते. चित्रकलेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात करियर करता येते. पं. नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना केवळ चित्रकला शिकण्यासाठी शांती निकेतनला पाठवले होते, तर रवींद्रनाथ टागोर, होमी भाभा हे देखील चित्रकार होते. चित्रकला जोपासताना एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर टाळून स्केच बुकच्या माध्यमातूनच चित्र साकारावे, असा सल्ला शेवटी दिला.
 
पालव म्हणाले की, भारतीय कला विश्वात दोन स्तंभ आजही कार्यरत आहे. एक शिल्पकार राम सुतार तर दुसरे शि. द. फडणीस आहे. मनाचा जो स्पर्श आहे तो तंत्रज्ञानात नाही. त्यामुळे कला जोपासताना तंत्रज्ञानाचा वापर टाळला पाहिजे. दुर्लक्षित सुलेखनाची कला पूर्वी समाजाला माहीत होत आहे. आज सुलेखनकार घडत आहे आणि हा वारसा पुढे सुरु ठेवायचा आहे, असे ते शेवटी म्हणाले. 
 
यावेळी उत्कृष्ट शैक्षणिक वर्गकाम ठरलेले विद्यार्थी प्रथम वर्ष सिद्धी कुंभार, समीक्षा पाटील, पूजा गोल्डर, द्वितीय वर्ष श्रुती तापकीर, आर्या पाटील, सानिका पिपाडा तृतीय वर्षातील स्वर्ण पाटील, सार्था राजकुंवर, मनिष गुण्णाला तर अंतिम वर्षातील अनुराग भारती, वैष्णवी बाबर,नेहा बर्वे या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. या प्रदर्शनामध्ये चारशे हून अधिक विद्यार्थ्यांचे चित्र पाहायला मिळणार आहे. प्रास्ताविक  प्राचार्य जयप्रकाश कलवले, सूत्रसंचालन प्रा प्रियांका कुंजीर,सार्था राजकुंवर, सई काळे यांनी केले  तर आभार देवश्री कुलकर्णी हिने मानले.

Related Articles