वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप   

तुरूंग अधिकार्‍यांनी वृत्त फेटाळले

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बबन गिते टोळीतील दोन कैद्यांनी बीड जिल्हा कारागृहात चोपल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने यासंदर्भातील वृत्त फेटाळले. असे काही घडले नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. 
 
बीड जिल्हा कारागृहात कराड आणि घुले यांच्या बाजूच्या बरॅकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी आहे. त्यालाही मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यासोबत परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गिते देखील आहे. कराड आणि महादेव गिते यांचे जुने वाद होते. ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी कराड आणि घुलेंना चांगलेच चोपले. दरम्यान कारागृह अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.

कृष्णा आंधळे अद्याप बेपत्ताच 

संतोष देशमुख यांच्या हत्येला १११ दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही. पोलिस, आणि सीआयडीची पथके पोलिसांचा शोध घेत आहेत. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून, आंधळेची माहिती देणार्‍याला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. 
 

Related Articles