गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार   

इजिप्तच्या प्रस्तावाला मान्यता 
 
खान युनूस, (गाझा पट्टी) : हमासने इजिप्तचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ५० दिवसांच्या युद्धबंधीच्या काळात हमासने इस्रायलच्या पाच ओलिसांची सुटका करण्यास सहमती दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वीच इजिप्त आणि कतारने हा प्रस्ताव हमासला दिला होता. हा प्रस्ताव अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या प्रस्तावाशी मिळताजुळता आहे. युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणार्‍या देशांनाही हा प्रतिप्रस्ताव पाठविण्यात आला आहे. इस्रायल हमासने ताब्यात घेतलेल्या २४ पैकी पाच ओलिसांची सुटका करण्यास आग्रही आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्रायल कॅट्झ यांनी हमासला इशारा दिला की, ओलिसांची सुटका होईपर्यंत इस्त्रायल गाझाच्या काही भागांमध्ये आपली उपस्थिती कायम ठेवेल.
 
इस्रायलने दीड आठवडयापूर्वी हमाससोबतची शस्त्रसंधी संपुष्टात आणून अचानक हल्ले करून शेकडो लोकांचा बळी घेतला. हमासने सत्ता सोडावी, निःशस्त्रीकरण करावे आणि आपल्या नेत्यांना निर्वासित करावे, अशी इस्रायलची इच्छा आहे. तर पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात, कायमस्वरूपी शस्त्रसंधी आणि गाझामधून इस्रायलने माघार घेतल्याच्या मोबदल्यात उर्वरित ओलिसांंची सुटका करणार असल्याचे हमासने म्हटले आहे.
 
दरम्यान, इस्रायलने मार्चच्या सुरूवातीला हमासविरोधात लष्करी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या सैन्याने दक्षिण गाझामधील राफा येथे अल जनिना भागात सुरक्षा क्षेत्राचा विस्तार केला आहे. या मोहिमेत हमासच्या दहशतवादी संरचना नष्ट करण्यात आल्या आहेत.

गाझात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू 

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख १३ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात डिसेंबरमध्ये युद्धबंदी सुरू झाली. ते जानेवारीमध्ये संपले. यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हल्ले सुरू केले आहेत. युद्धबंदीनंतर सुरू झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६७३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

Related Articles