पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट   

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ताफ्यातील आलिशान मोटारीत स्फोट झाला. मध्य मॉस्कोमधील एफएसबी या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ ही घटना घडली. स्फोटानंतर मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. 
 
पुतीन एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका आलिशान मोटारीच्या इंजिनने अचानक पेट घेतला. नंतर ही आग मोटारीत पसरली.  जवळच्या रेस्टॉरंट्स आणि बारमधील कर्मचारी तात्काळ मदतीला धावले. मात्र, क्षणार्धात आगीने मोटारीला कवेत घेतले आणि मोटार जळून खाक झाली. या मोटारीत कोण होते, हे अद्याप समोर आलेले नाही. 
 
दरम्यान, ही दुर्घटना होती की घातपात हे अद्याप समोर आले नाही. पुतीन अनेकदा ही लिमोझिन मोटार वापरतात. गेल्या वर्षी त्यांनी अशी मोटार उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनाही भेट दिली होती. ती रशियामध्ये बनवली जाते. 

झेलेन्स्की यांनी केली होती भविष्यवाणी  

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी २६ मार्च रोजी एका मुलाखतीत दावा केला होता की, पुतीन यांची प्रकृती खालावली आहे. लवकरच त्यांचा मृत्यू होणार असून, रशिया-युक्रेनमधील युद्ध संपेल.   

रशियाच्या हल्ल्यात खार्कीवमध्ये दोन ठार 

रशियाने खार्कीवमधील लष्करी रुग्णालय, शॉपिंग सेंटर, अपार्टमेंट आणि इतर इमारतींवर शनिवारी रात्री उशिरा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण ठार झाले तर ३५ जण जखमी झाले. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने शनिवारी रात्री  १११ स्फोटक ड्रोन डागले. त्यापैकी ६५ ड्रोन रोखण्यात खार्कीवला यश आले.  दरम्यान, युक्रेनवर जास्तीत जास्त दबाव आणण्यासाठी आणि शस्त्रसंधी चर्चेत क्रेमलिनची वाटाघाटीची भूमिका मजबूत करण्यासाठी रशियन सैन्य येत्या आठवड्यात नवीन लष्करी आक्रमण सुरू करण्याच्या तयारीत आहे.
 

Related Articles