दोनदा चूक झाली, आता इकडे-तिकडे जाणार नाही   

नितीश कुमार यांचे अमित शहांना आश्वासन 

पाटणा : आमच्या पक्षातील काही लोकांनी गडबड केली होती, म्हणून आम्ही  इकडे-तिकडे गेलो होतो. मात्र, आता कधीही भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही, असे आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले. 
 
पाटणा येथे विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात नितीश कुमार बोलत होते. ते म्हणाले, पूर्वी बिहारमध्ये गुंडराज होते; पण आमच्या सरकारने ते संपवले. आज नागरिक रात्री उशिराही न घाबरता रस्त्यावर फिरू शकतात. यापूर्वीच्या सरकारांनी काहीही केले नाही. लोकांना फक्त हिंदू आणि मुस्लिमांच्या नावावर लढायला लावले. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात विस्तार नव्हता, लोकांवर योग्य उपचाराची व्यवस्था नव्हती. जेव्हापासून आमचे सरकार आले, तेव्हापासून आम्ही संपूर्ण यंत्रणा सुरळीत करत आहोत. मी यापूर्वी दोनदा चूक केली, पण आता ते होणार नाही. 

वाजपेयींनी मला मुख्यमंत्री बनवले  

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच मला मुख्यमंत्री बनवले होते.  वाजपेयी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. आपण हे कसे विसरू शकतो? आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे  त्या वेळी बिहारमध्ये काहीही काम झाले नव्हते. ते लोक हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फक्त वाद घालण्यात व्यस्त होते. शिक्षणाबाबत कुठलेच साधन नव्हते. जेव्हा आपण २००५ मध्ये आलो, तेव्हा हे सर्व दुरुस्त केले. आमचे सरकार शिक्षण आणि आरोग्याबाबत गंभीर आहे.
 

Related Articles