’कर्मयोग हा गीतेचा मूलभूत आधार’   

प्रा. शैलजा कात्रे यांचे प्रतिपादन

पुणे : लोकमान्यांनी भगवद्गीतेचे विश्लेषण करत पारंपरिक ‘ज्ञान-कर्म-भक्ती’ या त्रिस्तरीय व्याख्येला छेद देत कर्मयोगाला सर्वोच्च स्थान दिले. गीतेचा उद्देश केवळ संन्यास किंवा वैराग्य शिकवणे नसून, प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी कर्म म्हणून पार पाडावी आणि त्यातूनच जीवनाचे सार्थक करावे, असा सांगितला आहे. लोकमान्यांनी ‘गीता रहस्य’ ग्रंथात गीतेच्या १८ अध्यायांची संगती लावत कर्मयोगाच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीचा मार्ग स्पष्ट केला, असे प्रतिपादन प्रा. शैलजा कात्रे यांनी रविवारी व्यक्त केले.ग्रंथ गीतारहस्य जयंतीनिमित्त ’केसरी’ व ’टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तर्फे ’लोकमान्यांच्या गीतारहस्यातील अध्यायसंगती’ या विषयावर गीताधर्म मंडळाच्या कार्यकारणी सदस्या प्रा. शैलजा कात्रे यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
 
कात्रे म्हणाल्या, लोकमान्यांनी त्यांच्या ‘गीता रहस्य’ या ग्रंथात भगवद्गीतेचे विश्लेषण कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून केले आहे. गीतेच्या अध्यायांची सुसंगत मांडणी करत त्यांनी कर्माला सर्वोच्च स्थान दिले आहे. 
 
टिळकांच्या मते, गीता केवळ ज्ञान आणि भक्तीचा उपदेश करणारा ग्रंथ नसून, ती प्रत्यक्ष कृतीवर म्हणजेच कर्मयोगावर आधारलेली आहे. त्यांच्या या अभ्यासात गीतेचे १८ अध्याय कर्मयोगाशी जोडले गेले असून, प्रत्येक अध्याय हा पुढील अध्यायासाठी आधारस्तंभ ठरतो.कात्रे पुढे म्हणाल्या, टिळकांच्या मते, गीतेतील पहिला आणि दुसरा अध्याय संवादाची प्रस्तावना असून, यात अर्जुनाच्या संभ्रमाचे निराकरण करत श्रीकृष्ण कर्मयोगाचा पाया घालतात. त्यानंतर तिसर्‍या ते सहाव्या अध्यायांमध्ये कर्मयोगाचे सखोल विश्लेषण आहे. सातव्या ते बाराव्या अध्यायांमध्ये कर्माला भक्ती आणि ज्ञानाची जोड दिली जाते. तर, तेराव्या ते अठराव्या अध्यायांमध्ये कर्मयोगाचा समारोप होत मोक्षप्राप्तीचा मार्ग स्पष्ट केला जातो.
 
लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’ या ग्रंथाने गीतेच्या अभ्यासाला नवीन दिशा दिली. त्यांनी गीतेचे तत्त्वज्ञान केवळ आध्यात्मिक विचारांपुरते मर्यादित न ठेवता, ते व्यावहारिक जीवनात कसे उपयुक्त ठरू शकते, यावर भर दिला. त्यांचा हा दृष्टिकोन पारंपरिक व्याख्येपेक्षा वेगळा आणि कृतीप्रधान असल्यामुळे गीतेच्या अभ्यासकांसाठी आणि जीवनाचे तत्वज्ञान शोधणार्‍यांसाठी ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, असेही विविध उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केले.
 
गीतारहस्याचे विवेचन लोकमान्यांनी सविस्तर केले आहे. तिसर्‍या अध्यायांमध्ये कर्माचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे. कर्म कोणाला चुकले नाही. कर्म करणे हे आवश्यक असून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केले पाहिजे, असेही कात्रे यांनी यावेळी नमूद केले.
 

Related Articles