गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १० हजारांवर वाहनांची खरेदी   

पुणे : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा, या दिवशी कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, शुभ मानले जाते. गुढीपाडव्याला वाहन खरेदी करण्यासाठी एक शुभ काळ मानला जातो. या दिवशी अनेक नागरिक वाहने खरेदी करतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीला मागणी वाढली असून, प्रामुख्याने दुचाकी खरेदीत दोन हजार २०० नी वाढ झाली आहे, तसेच चारचाकी, रिक्षा आणि बस खरेदीची संख्याही वाढली आहे. यावर्षी गुढीपाडव्याला शहरातील रस्त्यावर नव्याने १० हजार १७० वाहनांची भर पडणार आहे.
 
दुचाकींचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे; परंतु गुढी पाडवा, अक्षयतृतीया, दिवाळी या महत्त्वाच्या सणांसह वर्षभर शहरात वाहने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. आता तर वाढत्या दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने पुणे चारचाकीचे शहर अशी नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकी, कारसह सर्वच वाहनांमध्ये वाढ झाली आहे. २०२४ मध्ये गुढीपाडव्याला चार हजार २२१ मोटारसायकल खरेदीच्या नोंदी झाल्या होत्या, तर यंदा २०२५ मध्ये सहा हजार ५१० नवीन नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोन हजारांपेक्षा जास्त दुचाकींची खरेदी वाढली आहे. चारचाकी वाहनांमध्येही गतवर्षी दोन हजार ३२६ नोंदी झाल्या होत्या, तर यंदा दोन हजार ४२४ मोटारीच्या नोंदी झाल्या. त्यापाठोपाठ रिक्षा खरेदीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर गुड्स, बस आणि टॅक्सी या वाहनांची संख्याही वाढली आहे.
 

Related Articles