राज्यात रेडिरेकनरच्या दरामध्ये सरासरी ७ ते १० टक्के वाढ शक्य   

पुणे : मागील दोन वर्षानंतर प्रथमच २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेडी रेकरनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात सरासरी ७ ते १० टक्के एवढी वाढ होणार असल्याची चर्चा नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात सुरू आहे. त्यानुसार रेडी रेकनर दरवाढीचे प्रस्ताव तयार करून राज्यशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रस्तावित दरवाढ येत्या १ एप्रिलपासून लागू होणार आहे.नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी १ एप्रिल रोजी रेडी रेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहेत. 
 
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहराच्या रेडी रेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य तक्ते) दरात सरासरी १५ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. तर नगरपालिका हद्दीत १२ टक्के तर ग्रामीण भागात सरासरी १० टक्के वाढीची शिफारस केली आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोनही महापालिका तसेच नगरपालिका हद्दीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत आहे. अशा प्रभाव क्षेत्रामध्ये १०.५० टक्के एवढी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
 
आज (सोमवार) रात्री उशीर राज्यशासनाकडून रेडी रेकनरचे दर जाहीर करण्यात येणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार राज्य शासनानी सुद्धा रेडी रेकनरमध्ये वाढ करणार असल्याचे मात्र, अवाजवी वाढ करणार नसल्याचे ही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे रेडी रेकनरच्या दरात किती वाढ होणार याकडे बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
 

Related Articles