पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या सीएनजी बस उपलब्ध   

प्रवाशांना दिलासा 

पुणे : पीएमपीच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंगअभावी मार्गावरच बंद पडत असल्याने त्याचा प्रवाशांना चांगलाच फटका बसत होता. यावर प्रशासनाने पर्याय काढला असून पीएमपीच्या ताफ्यात आता नव्याने २५ टक्के सीएनजी बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 
गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये पीएमपीच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग अभावी मार्गावरच बंद पडल्याने शेकडो प्रवाशांना चांगला फटका बसत होता. यावर चांगला उपाय म्हणून पीएमपी प्रशासनाने सीनजीचा पर्याय काढला आहे. यासाठी ’इ’ आगारात २५ टक्के सीएनजी बस नव्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दुपारच्या सत्रात गर्दी कमी असताना ’इ’ बस पूर्ण क्षमतेने चार्ज केल्या जातील. तेव्हा सीएनजी बसच्या अधिक फेर्‍या वाढविण्यात येतील. हा उपाय भेकराईनगरच्या आगारात प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बस बंद पडण्याच्या तक्रारी कमालीच्या घटल्या आहेत. 
 
पीएमपीच्या पुण्यात पाच ’इ’ आगार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भेकराईनगर, पुणे स्टेशन, निगडी, बाणेर आणि वाघोली यांचा समावेश आहे. यातून ४९० ’इ’ बस सेवा देतात. यातील काही बस जुन्या झाल्या आहेत. याशिवाय चार्जिंगमधील तांत्रिक अडचणीमुळे त्या दुपारी बंद पडतात. भेकराईनगरप्रमाणे इत्तर चारही आगारात सीएनजी बसची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे बर्‍याच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 

Related Articles