हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा   

भाग्यश्री पटवर्धन

युवा वर्ग , ज्यांच्या हातात शेअर बाजारामुळे पैसे खेळतो आहे आणि ज्यांना आकांक्षा आहेत असा मोठा ग्राहक वर्ग  हे कार कंपन्यांच्या दृष्टीने लाभदायक आहे. दोन महिन्यापूर्वी रिझर्व बँकेने व्याज दरात कपात केल्याने पुन्हा एकदा मागणीचा जोर आगामी काळात वाढेल आणि कार कंपन्यांचा खप वाढेल असा अंदाज आहे.
 
सर्वप्रथम वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण सर्वांनी चैत्र प्रतिपदा म्हणजे पाडव्याला गुढी उभारून नवे संकल्प केले असतील. त्यात बचत-गुंतवणूक-भविष्यकालीन तरतूद, निवृत्तीचा खर्च याचे काही नियोजन आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा प्रत्यय यायला हवा असेल तर अजूनही विलंब झालेला नाही. उभारा गुंतवणुकीची गुढी!
 
क्रिसिल अहवालानुसार वर्ष २०२३ मधील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर आधारित जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून गणल्या गेलेल्या ह्युंदाई समूहाचा एक भाग असलेल्या हुंदाई मोटारीने  १५ ऑक्टोबर २०२४ रोजी  प्राथमिक समभाग विक्री केली. प्रती इक्विटी शेअरसाठी  १८६५ रुपये ते १९६० रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. बोली किमान ७ इक्विटी शेअर्ससाठी होती. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रवर्तक विक्री भागधारक १४२,१९४,७००  इक्विटी शेअरपर्यंतची ऑफर फॉर सेल समाविष्ट होती. आज कंपनीचा शेअर १७१५ रुपयाच्या घरात आहे. याचा अर्थ नोंदणीवेळी असलेला १९३० रुपये हा भावही टिकलेला नाही. दोन्हीमध्ये सुमारे २०० रुपयांहून अधिक फरक  दिसतो आहे.  प्राथमिक भागविक्रीत ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांना हे शेअर मिळाले त्यांना आता पस्तावायची वेळ आली का असे वाटत असेल. मात्र भारतात सध्या तरी तशी स्थिती नाही. वाहन उद्योगात विशेषतः प्रवासी वाहन निर्मिती क्षेत्रात मारुती, टाटा, मर्सिडीज यासारखे स्पर्धक असताना हुंदाईच्या कार किती खपणार अशी शंका मनात येणे साहजिक आहे. मात्र युवा वर्ग, ज्यांच्या हातात शेअर बाजारामुळे पैसे खेळतो आहे आणि ज्यांना आकांक्षा आहेत असा मोठा ग्राहक वर्ग  हे कार कंपन्यांच्या दृष्टीने लाभदायक आहे.
 
दोन महिन्यापूर्वी रिझर्व बँकेने व्याज दरात कपात केल्याने पुन्हा एकदा मागणीचा जोर आगामी काळात वाढेल आणि कार कंपन्यांचा खप वाढेल असा अंदाज आहे. हुंदाई ही दुसर्‍या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी आहे. तिचे मागील तिमाहीचे निकाल आता पाहू. ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १९ टक्के कमी झाला आहे. १४२५ कोटी रुपयांवरून तो ११६१ कोटी रुपये झाला. अमेरिकेतील सत्ताबदलाने निर्यातीला बसलेला फटका आणि भारतीय बाजारात घसरलेली मागणी हे त्यामागचे कारण ठरले. विजेवर चालणार्‍या कारच्या बाजारात २० टक्के हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांचे निवेदन महत्वाचे मानले जाते. यासोबतच चालू म्हणजे नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकरात मिळणार्‍या सवलतींमुळे मागणी वाढेल असा अंदाज आहे. कंपनीच्या शेअरचा कमाल किमान भाव (< १,९७०-१,५५१) असा आहे. तंत्रज्ञानाचा पुढावा लक्षात घेता आगामी काळात व्यवसाय वाढ.

पीपीएफ योजनेत व्याजदरात दुजाभाव का

पीपीएफ ही कोट्यवधी भारतीयांना करमुक्त उत्पन्न्न देणारी सर्वात सुरक्षित योजना. पोस्ट आणि सरकारी बँकात या योजनेत खाते उघडून अनेकांनी आपल्या उतारवयातील चरितार्थाची सोय केली इतकेच नाही तर आणीबाणीच्या प्रसंगी या योजनेतील रक्कम उपयोगी ठरल्याची उदाहरणे आहेत. ज्या नागरिकांनी मूल जन्मताच या योजनेत गुंतवणूक केली त्यांना मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च  पेलणे सोपे झाले. आजही ही योजना आकर्षक आहे कारण तीत मिळणारे उत्पन्न  करमुक्त आहे. केंद्र सरकारने मात्र आगामी आर्थिक वर्षांपासून त्यात १८ वर्षाखालील खातेदारांना (मायनर) मिळणार्‍या व्याजाचे दर कमी केल्याने मोठा अन्याय होणार आहे. मुळात एकाच योजनेत १८ वर्षापर्यंत पोस्टाच्या बचत खात्याइतका म्हणजे चार टक्के  व्याजदर आणि १९ व्या वर्षांपासून ७.१ टक्के हा दुजाभाव का केला जातो? महागाईला सामोरे जाताना जे सर्वात सुरक्षित पर्याय आहेत त्यात पीपीएफ असल्याने हा फरक ठेवणे नव्या करपद्धतीत अनावश्यक ठरते असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.
 

Related Articles