वाचक लिहितात   

निवडणूक आयोगाने विश्वासार्हता जपावी

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर विरोधकांनी ईव्हीएम यंत्रामध्ये घोटाळा आहे, तसेच यंत्राद्वारे झालेले मतदान व एकूण मतदारांची संख्या सारखीच असायला हवी; पण तसे आढळून न आल्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर व सरकारवर हल्लाबोल केला होता. याच गोष्टींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने आपल्या काही बाबींमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले असेल, तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे, असे म्हटले पाहिजे. निवडणुकांचे निकाल हे पारदर्शी व तसेच कोणाच्याही मनात ’किंतु’ ’परंतु’ला जागा असणारे नसावेत. या संदर्भात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, विरोधक काही कालावधीपासून मतदान यंत्राद्वारे निवडणुका घेऊ नका, तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असा कंठशोष करत आहेत. मतदान यंत्रात फेरफार करून निवडणुका जिंकता येऊ शकतात, असा त्यांचा आरोप आहे; पण यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोग तसेच न्यायालयाने सुद्धा, मतदान यंत्रामध्ये फेरफार करता येत नाही, असा निर्वाळा देऊन विरोधकांना गप्प केले आहे. यंत्राद्वारे झालेले मतदान व मतदारांची फुगलेली संख्या, यात तफावत कशी? हे स्पष्ट व्हायला हवे; पण अलीकडेच निवृत्त झालेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या काळात ही आकडेवारी देण्यास नकार देण्यात आला. निवडणूक आयोगाने विरोधकांची केलेली ही फसवणूकच आहे. नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी बूथनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई  

अफवांवर विश्वास ठेवू नका

राज्यात वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे सामाजिक व धार्मिक स्थिती कमालीची ढासळत आहे. यामुळे जनसामन्यांना जगणे कठीण होत आहे. यामुळे अफवांचे पिकं हे दररोज नवनव्या रूपात पुढे येत आहे. त्यामुळे रोजंदारीवर जगणार्‍या लोकांचे हाल होत आहेत. जीव मुठीत घेऊन कामावर व कर्तव्यावर जावे लागते व जीव मुठीत घेऊन परत यावे लागते. या दरम्यान परिवारातील सदस्य सारखी वाट पाहत राहतात. शासनाने व विशेषतः पोलीस प्रशासनाने सर्वप्रथम या अफवा पसरविणार्‍याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे, तसेच घाबरलेल्या नागरिकांना धीर देणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यांना सुरक्षित जाता यावे व परत येता यावे याबाबतही दक्षता महत्त्वाची आहे.

धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

भाकीत उष्णतेच्या लाटेचे

मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांत कमाल आणि किमान तपमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात उष्णतेच्या लाटेचे प्रमाणही जास्त राहू शकते, असा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात देशात अल निनोचा प्रभाव दिसून येईल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे; मात्र उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेने सर्वांची चिंता वाढवली आहे. मागील वर्षीही उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती; मात्र यावर्षी उष्णतेच्या लाटेचे प्रमाण अधिक असल्याने चिंता अधिक वाढली आहे. राज्यातील काही भागांत आताच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. राज्यातील पाणी साठा कमी होत असताना तीव्र उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात जमिनीचा ओलावा कायम राखून पिके जगवण्यासाठी धरणांच्या पाण्याचे नियोजन सरकारी पातळीवर वेळीच करणे गरजेचे आहे. जगात एकाच वेळी वेगवेगळे हवामान पहावयास मिळत आहे. जगात कुठे उष्णतेची लाट अनुभवयास मिळते, तर कुठे प्रचंड पाऊस पाहायला मिळतो, तर कुठे कडाक्याची थंडी अनुभवयास मिळत आहे. अल निनोचा प्रभाव भारतासह जगातील सर्वच देशांवर पडत असल्याने केवळ भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.   

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य, पण...

बनावट मतदार ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी तसेच बनावट मतदान टाळण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या जोडणीनंतर आता आधारकार्डला मतदान ओळखपत्र जोडल्यामुळे एकूणच निवडणूक आणि मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडावे लागणार आहे. आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक असल्यामुळे वैयक्तिक गोपनीय माहिती बाहेर फुटू शकते, तसेच मोठ्या प्रमाणावर लोकांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हा निर्णय योग्य असला तरी अनेक आक्षेपांमुळे त्याची अंमलबजावणी करताना आयोगाला अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

क्रिकेटखेरीज अन्य क्रीडा प्रकार उपेक्षित

’भारतीय क्रिकेट संघाला ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर’ हे वृत्त (केसरी दि.२१ मार्च) वाचनात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५ च्या विजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव केला असून मंडळाने ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. हा पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला देण्यात येणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी बजावली आणि संघ अभिनंदनास, बक्षीसास पात्रदेखील आहे; परंतु इतर क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी बजावणार्‍या खेळाडू तसेच संघावर असा कधी बक्षिसांचा वर्षाव झालेला बघायला मिळत नाही. इतकेच काय जनतादेखील क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांत भारतीय संघाने बजावलेल्या कामगिरीची सहसा दखल घेताना दिसत नाही; त्यांच्या वाट्याला केवळ उपेक्षाच येते. क्रिकेटबाबत जे काही घडते त्यांचीच दखल घेतली जाण्याच्या भारतीयांंच्या मानसिकतेनुरुपच हे म्हणावे लागेल. मध्यंतरी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पार पडलेल्या ’खो-खो’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी जगज्जेतेपद मिळवण्याच्या घटनेची नागरिकांकडून आणि दृश्य - मुद्रीत माध्यमांतून देखील हवी तशी दखल घेतली गेली नाही. भारतीय क्रीडा इतिहासात एकाच दिवशी एकाच स्पर्धेत पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ जगज्जेते ठरण्याची कामगिरी क्वचितच नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात खो-खो आशियाई क्रीडा स्पर्धा भरवण्याची, तसेच २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश करण्याचा सरकारचा मानस आहे, तसेच झाले तर तब्बल १०० वर्षांनी खो-खो खेळास पुन्हा सन्मान मिळेल. कारण १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत खो-खोचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश झाला होता;  परंतु त्यानंतर हा खेळ आशियाई स्पर्धेतही दिसला नाही. 
 
जगज्जेत्या भारतीय पुरूष आणि महिला खो-खो खेळाडूंचे देशवासीयांकडून पुरेसे स्वागत तर झाले नाहीच, उलटपक्षी सरकारने या जगज्जेत्या खेळाडूंची केवळ पदके आणि चषक देऊन बोळवण केली आहे. प्रसार माध्यमांतून दिवस-रात्र प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळा प्रक्षेपणाचा रतीब चालू होता; परंतु खो-खो जगज्जेत्या खेळाडूंची साधी मुलाखत घेण्याची गरज वा आवश्यकता कोणा प्रसार माध्यमांना वाटू नये?
 
मध्यंतरी मुंबईत टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी तब्बल आठ लाख क्रिकेटप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. विजयी मिरवणूक आटोपल्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसरात पादत्राणांचा पडलेला खच आणि इतस्ततः पडलेला इतर कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना रात्रभर खपून स्वच्छता मोहीम राबवून मरिन ड्राइव्ह परिसर स्वच्छ करावा लागला होता. क्रिकेटच्या खेळात पैशाचा अखंड महापूर वाहतो. बक्षिसे, जाहिराती, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आदी माध्यमातून क्रिकेटपटू भरभक्कम कमाई करताना दिसतात; परंतु अस्सल देशी खेळांमध्ये नैपुण्य मिळवणार्‍या खेळाडूंना सर्वच पातळ्यांवर उपेक्षा सहन करावी लागते. देशी खेळातील नैपुण्य प्राप्त खेळाडूंचे मनोधैर्य उंचविण्यासाठी सरकार तसेच समाजातील धनिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वदेशीकरणाचे वारे केवळ उत्पादन क्षेत्रातच लाभाचे नसून क्रीडा क्षेत्रातही ते वाहण्याची आवश्यकता आहे. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे 

 

Related Articles