क्रिकेट सामना आणि विवाह   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे 
 
विवाह हा कोणाच्याही आयुष्यातील एक महत्वाचा दिवस असतो. हा दिवस कायमच स्मरणात राहावा यासाठी सगळेच प्रयत्न करतात. पण काही मंडळी अशी देखील असतात की जे स्वतःच्या लग्नाच्या दिवशी देखील आपल्या कामाशी किंवा व्यवसायाशी बांधील असतात. हा एका अर्थाने वेडेपणाच. पण अशी वेडी मंडळी जगात आहेत म्हणूनच कदाचित हे जग वेगळे भासत असावे. असाच काहीसा वेडेपणा काही क्रिकेटपटूंनी देखील केला आहे. म्हणजे स्वतःच्याच लग्नाच्या वेळी ते लग्नाला तर उपस्थित होतेच, पण त्याचबरोबर ते मैदानात क्रिकेट देखील खेळत होते. 
 
सुधाकर अधिकारी हे नाव मुंबई क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सुधाकर अधिकारी मुंबईसाठी जवळजवळ १२-१३ वर्षे खेळले. ते एक उत्तम फलंदाज होते. मुंबईसाठी सलामीला फलंदाजी करताना १९६० च्या दशकात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मुंबई क्रिकेटचा तो सुवर्णकाळ म्हटला पाहिजे, आणि त्यावेळी अधिकारी हे मुंबईच्या संघाचे अविभाज्य भाग होते. त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी, १९५९-६० मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले. बघता बघता मुंबई रणजी संघात त्यांनी आपले स्थान पक्के केले. १३ नोव्हेंबर १९६५ रोजी मुंबईमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा सामना होणार होता. त्याकाळी रणजी ट्रॉफीचे सामने अतिशय चुरशीचे होत असत. पश्चिम विभागात मुंबई आणि महाराष्ट्र हे दोन्ही संघ ताकदवान होते. या दोन्ही संघांमध्ये ’तालीम शिल्ड’ साठी होणारा सामना कायमच क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेत असे. 
 
१९६५ चा तो सामना देखील चुरशीने खेळला जाईल याची क्रिकेट रसिकांना खात्री होती. मुंबईच्या त्या संघात फारुख इंजिनियर, बापू नाडकर्णी, पद्माकर शिवलकर, रमाकांत देसाई, अजित वाडेकर यासारखी दिग्गज मंडळी होती. त्या संघात अधिकारींची निवड झाली होती. नेमक्या त्याच दिवशी, १३ नोव्हेंबर रोजी अधिकारी यांचा विवाह सोहळा होता. पण तशातही अधिकारी यांनी रणजीचा तो महत्वाचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्या काळी खेळाडूंवर आजच्या सारखी फारशी बंधने नव्हती. किंबहुना आंतरदेशीय क्रिकेट मध्ये, अगदी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत असताना देखील क्रिकेटपटू जर त्या शहरात राहणारा असेल तर आपल्या घरीच राहून सामन्याला येत असत. सुधाकर अधिकारी त्या दिवशी सकाळी ९ वाजता स्वतःच्या लग्नाला उभे राहिले. लग्न लागल्यानंतर लगेचच त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियम गाठले आणि सामन्यासाठी  उपस्थित राहिले. नाणेफेक  जिंकून मुंबई संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अधिकारी-इंजिनियर जोडी मैदानावर उतरली. त्या सामन्यात उत्तम फलंदाजी करत पहिल्या डावात सुधाकर अधिकारींनी शतक केले. त्यांच्या ११० धावांच्या खेळीमुळे मुंबई संघाला ३८१ अशी धावसंख्या उभारता आले. तो संपूर्ण दिवस मैदानावर फलंदाजी केल्यानंतर, संध्याकाळी खेळ संपल्यावर ते स्वतःच्याच लग्नाच्या रिसेप्शनला उभे होते, आणि परत दुसर्‍या दिवशी सकाळी सामना खेळण्यासाठी मैदानावर उपस्थित होते. 
 
सुधाकर अधिकारींचा हा किस्सा आजही क्रिकेट जगतात खूप प्रसिद्ध आहे. स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी, लग्न लागल्यानंतर तासाभरात मैदानावर क्रिकेट खेळणारा असा क्रिकेटपटू विरळाच. पुढे अनेक वर्षानंतर त्यांना याबद्दल विचारले गेले तेंव्हा त्यांचे उत्तर देखील त्यांच्या कृतीप्रमाणेच निराळे होते. ते म्हणतात, त्याकाळी मुंबई संघात खेळण्यासाठी अनेक क्रिकेटपटू इच्छुक होते. या संघातून खेळण्यासाठी खेळाडू, त्यातही अनेक सलामीचे फलंदाज अक्षरशः पॅड लावून बसले होते. मी जर एखादा सामना सोडला असता, तर दुसर्‍या फलंदाजाला संधी मिळाली असती. त्याने त्या संधीचे सोने करून चांगली खेळी केली असती, तर  संघातील माझे स्थान निश्चितच धोक्यात आले असते. मी कोणत्याही प्रकारे मुंबईसाठी खेळण्याची संधी सोडू शकत नव्हतो. त्यामुळेच विवाह झाल्यानंतर लगेचच मी मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. सुधाकर अधिकारी आणि त्यांच्या क्रिकेट प्रेमाला सलाम. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशाच काही घटना घडल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल याच्या लग्नाचा किस्सा देखील प्रसिद्ध आहे. २००४ मध्ये तो आणि त्याची वाग्दत्त वधू यांनी जानेवारी महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी वेस्ट इंडीजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर होता. १६ जानेवारी २००४ रोजी दोन्ही संघांमध्ये सेंच्युरियन येथे कसोटी सामना सुरु होणार होता. या सामन्यासाठी आपली निवड होणार नाही असेल नेलला वाटले आणि त्याने १७ जानेवारी ही लग्नाची तारीख निश्चित केली. प्रथेप्रमाणे चर्चमध्ये सगळी सोय करण्यात आली, निमंत्रणे गेली. एकूणच लग्नाची तयारी सुरु होती, आणि इकडे आंद्रेची त्या सामन्यात खेळण्यासाठी निवड करण्यात आली. त्या परिस्थितीत त्याने खेळण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवशी, आफ्रिकेने नाणेफेक  जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दोन दिवस त्यांनी टिच्चून फलंदाजी केली . सामन्याच्या दुसर्‍या दिवशी, १७ जानेवारी रोजी त्यांनी ६०४/६ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला, आणि उरलेल्या थोड्या वेळात वेस्टइंडीज संघाने बिन बाद ७ धावा केल्या. त्या दिवशी कमी सूर्यप्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला. 
 
इथे खर्‍या अर्थाने नेलची धावपळ सुरु झाली. त्याने मैदानावर हेलिकॉप्टरची सोय केली होती. त्याचा विवाह होत असलेले गाव सेंच्युरियन पासून एक-दीड तासाच्या अंतरावर होते. पण स्वखर्चाने हेलिकॉप्टरची सोय करून तो लगेचच त्या गावी पोहोचला, ठरल्याप्रमाणे त्याने लग्न केले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी परत एकदा तो सामना खेळण्यासाठी सेंच्युरियनला परतला. त्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात ३ आणि दुसर्‍या डावात २ बळी घेत त्याने आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी मदत केली. दुर्दैवाने त्याचा तो विवाह फार काळ टिकला नाही. पुढे ४-५ वर्षातच त्याने आपल्या पत्नी पासून घटस्फोट घेतला. 
 
वेस्ट इंडीजच्या क्लाईड बट्सची गोष्ट अजूनच वेगळी आहे. क्लाईड बट्स हा खेळाडू लक्षात असण्याचे फारसे कारण नाही. हा ऑफस्पिन गोलंदाज वेस्ट इंडीजकडून ७ कसोटी सामने खेळला . १९८५ मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जॉर्जटाऊन, गयानाचा रहिवासी असणार्‍या बटसने आपल्याच शहरात आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्याच्या ’विश्रांतीच्या’ दिवशी, ९ एप्रिल १९८५ रोजी त्याचा विवाह सोहळा पार पाडला. या सोहळ्याच्या वेळी वेस्ट इंडीज संघ आणि न्यूझीलंडच्या संघातील काही खेळाडू उपस्थित होते. बट्स या सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. फलंदाजी करताना त्याने केवळ ९ धावा केल्या, तर गोलंदाजी करताना त्याला ४७ षटकांमध्ये एकही बळी मिळवता आला नाही. 
 
इंग्लंडचा टोनी पिगॉट आपल्या कसोटी कारकिर्दीत एकच सामना खेळला. १९८४ मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने आपला विवाह निश्चित केला होता, पण संघात निवड झाल्यामुळे त्याने हा सोहळा पुढे ढकलला आणि सामना खेळण्यास प्राधान्य दिले. गमतीची गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या संघाने किवी संघासमोर नांगी टाकली आणि एक डाव आणि १३२ धावांनी पराभव स्वीकारला. न्यूझीलंडने तिसर्‍या दिवशीच हा सामना जिंकला. पिगॉटने या सामन्यात दोन्ही डावात मिळून १२ धावा केल्या आणि २ बळी देखील मिळवले. दुर्दैवाने त्याला पुढे इंग्लंडसाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. लग्न आणि क्रिकेट या दोहोंपैकी क्रिकेटला काहीसे प्राधान्य देणार्‍या काही ’वेड्या’ क्रिकेटपटूंचे हे काही किस्से.      
 

Related Articles