E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
नववर्षाचा सृष्टिसंकेत
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
सरस्वतीचंद्र विद्याव्रती
गुढीपाडवा हा प्राचीन भारतीयांनी वर्षाचा प्रारंभ मानला. नवसंवत्सराचा हा आरंभदिवस.सूर्य आपल्या राशिचक्रातील पहिल्या राशीत पुन्हा प्रवेश करतो, तो हा दिवस. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते.
सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी असलेला काळ हा अनंत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय किंवा आरंभ, मध्य आणि शेवट या त्रिविध अवस्थांपासून तो मुक्त आहे. त्याचा आरंभ कोणी पाहिला नाही, की शेवट पाहणेही शक्य नाही. तरीही आपण त्याला व्यावहारिक सोईसाठी वर्षांमध्ये आणि शतकांमध्ये बंदिस्त करतो.
आपल्याकडे कालगणनेसाठी ‘कल्प’, ‘मन्वंतर’ आणि ‘युग’ नंतर ‘संवत’चा क्रम लागतो. असे सांगितले जाते, की सत्ययुगात ब्रह्मसंवत; त्रेता युगात वामनसंवत, परशुराम संवत (सहस्रार्जुनाच्या वधानंतर) आणि राम संवत (रावणाच्या वधानंतर) होऊन गेले. द्वापार युगात युधिष्ठिर संवत होता. विद्यमान कलियुगात विक्रम, शालिवाहन, नागार्जुन, विजयाभिनंदन आणि कल्की असे पाच संवत आहेत. त्यातही विक्रम संवत आणि शालिवाहन संवत कालगणनेसाठी विशेषत्वाने प्रचलित आहेत.
आपल्या पूर्वजांची कालमापन पद्धतही निसर्गाशी संवाद साधणारी होती. एक ॠतू संपून दुसरा सुरू होण्याच्या संधिकालात नवे वर्ष आरंभ होत असे. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यादरम्यानच्या काळात दिवाळीतील पाडव्याच्या दिवसापासून ‘विक्रम संवत’, तर हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्यादरम्यानच्या काळात गुढीपाडव्यापासून ‘शालिवाहन संवत’ आरंभ होतो.
सृष्टिनिर्मितीच्या आधी या विश्वात काय असेल? फक्त अंधार असेल; असेल फक्त एक अनिश्चित पसारा. त्यातून संघटित सृष्टी निर्माण करणे हे ब्रह्मदेवाचे काम. या रंग-गंधहीन पसार्याला त्याने अस्तित्वाचे निश्चित अर्थ दिले आणि मग हे विश्व चैतन्यमय झाले, असे मानले जाते. सृष्टीची निर्मिती हा जगभरातील माणसांच्या सार्वत्रिक आकलनाचा व सार्वकालिक कुतुहलाचा विषय आहे. भारतात असे समजले जाते, की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि अनंत काळाचे चक्र गतिमान झाले. माणसाने आपल्या सोयीसाठी त्याचे विभाग पाडले कारण समग्र काळाचे आकलन, त्याची अनुभूती व गणना ही मानवी आवाक्याबाहेरची बाब होती.
अथर्ववेदात पाडव्याच्या दिवसाच्या पूजाविधीमध्ये कालपुरुषाच्या भिन्न अवयवांची पूजा सांगितली आहे. लव, क्षण, निमिष, घटका, प्रहर, दिवस, पक्ष, मास, ॠतू या सर्व कालविभागाचे या दिवशी स्मरण करायचे. आंध्र प्रदेशात या सणाला ‘उगादि’ म्हणजे ‘युगादि’ असे म्हणतात.पाडवा वसंताची चाहूल आणतो. आता सृष्टीत वसंत अवतरलेला असतो. हिवाळ्यात गोठलेले चैतन्य चैत्रस्पर्शाने जागे होते. जीवनाचा प्रवाह गतिमान होतो. झाडांना नवी पालवी येते; पक्षी झाडावर घरटी बांधतात. माणसाच्या मनातही निर्मितीची आवर्ती भावना कार्यरत होऊ लागते. सर्जनाची विविध रूपे सृष्टीतून प्रत्ययास येत असतात. नखशिखांत फुललेली अशोकाची झाडे, लालभडक फुलांनी डवरलेली पळस - पांगिर्याची मुग्धता, एरवी कडू असलेल्या निंबाला नव्याने आलेला उग्र-मधुर गंधाचा मोहोर आसमंतातील वसंतखुणा प्रक्षेपित करीत असतो. सृष्टीतील सर्वच सजीवांत असलेली नवनिर्मितीची आकांक्षा फलद्रूप होण्याचा हा काळ. या सृष्टिसंकेतातून अगदी सहजपणे जाणवते, की याच काळात विश्वनिर्मिती झाली असावी.
ज्योतिषशास्त्रानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्य वसंत संपातावर येतो आणि वसंत ॠतूला आरंभ होतो. भास्कराचार्यांनी याच दिवसाचा सूर्योदय आणि सूर्यास्त अभ्यासून संपूर्ण वर्षाचे पंचांग तयार केले होते. तिथीने हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आपल्याकडे गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त समजला जातो. या दिवशी केलेले कोणतेही कार्य फलदायी ठरत असते. त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.रामकथेचा गुढीपाडव्याशी निकटचा संबंध आहे. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केल्यावर प्रभू रामचंद्रांनी गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला आणि मग लोक कल्याणकारी रामराज्याला आरंभ झाला, असे समजले जाते. भगवान विष्णूंनी दशावतारातील पहिला मत्स्यावतार याच दिवशी घेतला आणि सृष्टीचे प्रलयापासून रक्षण केले, असे पुराणकथा सांगतात.
प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला तेव्हा नगरवासीयांनी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून केले, असे मानले जाते. आजही गुढी उभारली जाते ती निसर्गातील चैतन्याचे स्वागत करण्यासाठी. एका उंच काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधायची आणि त्यावर तांब्या-पितळ्याचा गडू लावायचा. ही गुढी आसनावर उभी करून उंच जागी ठेवायची. ही गुढी मनातील आनंदाला दृश्यरूप देण्याचे प्रतीक आहे. गुढीच्या काठीला ‘ब्रह्मदंड’ असे म्हणतात. ती सामर्थ्याचे आणि वैराग्याचे सूचन करते. महाभारत सांगते, की ती राजा वसूची आठवण ! त्याने आपल्या तपःसामर्थ्याने इंद्रालाही लाजवले. इंद्राने राजा वसूचा सत्कार केला आणि वैजयंती माळेबरोबरच त्याला एक वेळूची काठीही दिली. वसुने ती आदराने स्वीकारली आणि तिची पूजा केली. गुढीवरचा कलश हा यशाचे, तर कडुलिंबाचा पाला हा जीवनातील दुःखाचे आणि साखरेची गाठी हे आनंदाचे प्रतीक आहे. ही गुढी सूर्यास्तापूर्वी उतरवतात. गुढी उभारताना म्हणावयाचा मंत्र आहे.
‘ब्रह्मध्वजा नमस्तो
सर्वाभीष्ट फलप्रदे |
प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्य
मदगृहे मंगलंकुरू ॥’
याचा अर्थ असा, की ‘ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभ फल मला मिळू दे. या वर्षात माझ्या घरात मंगलमय वातावरण राहू दे.’ चक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’त या संदर्भात एक उल्लेख आलेला आहे. चक्रधर स्वामी एका नगरात आले असता, ‘सडासंमार्जने केली. चौक रंगमालिका भरलीया. गुढिया उभिलिया,’ असे त्यात वर्णन आढळते. संत ज्ञानेश्वरांची गुढी वेगळीच होती. भागवत धर्माची - वारकरी संपद्रायाची ती गुढी होती. ते म्हणतात - ‘माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ॥’
गुढीपाडव्यापासून ‘शालिवाहन शका’ला आरंभ होतो. शालिवाहन शक हा सातवाहन राजांशी संबंधित आहे. या सातवाहन राजांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही होती. सातवाहन राजांनी महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशावर दीर्घकाळ राज्य केले. इसवीसनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांना पराभूत केले. त्यामुळे त्यांना दक्षिणेत स्थलांतरित व्हावे लागले. या सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेविसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती आणि आईचे नाव गौतम बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धती रूढ असल्याने ते आपल्या नावामागे वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लावत असत. म्हणून तो गौतमीपुत्र सातकर्णी. नाशिकजवळील गोवर्धन येथे सातकर्णी आणि शक यांच्यात युद्ध झाले. त्यात शकांचा राजा नहनपान हा मरण पावला. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने आपला साम्राज्यविस्तार केला. शूर, धर्मनिष्ठ व प्रजाहितदक्ष असा हा गौतमीपुत्र सातकर्णी राजा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता आणि बौद्ध धर्माचा आश्रयदाता होता. हा गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे शालिवाहन. त्याचा शक या गुढीपाडव्यापासून आरंभ होतो.
चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवे वर्ष सुरू होत आहे. या दिवशी ‘काळ’ नावाच्या ज्या ग्रंथाला किती पाने आहेत, हे माहीत नाही, त्याचे आणखी एक पान उलटले जाईल. भूतकाळ रात्रीच्या अंधारात विलीन होईल. नव्या वर्षाचा सूर्य उगवेल. सर्जन आणि विसर्जनाची प्रक्रिया, तसेच जन्म-मृत्यूचे चक्र सृष्टीत अव्याहत गतिमान असते. गेल्याचा शोक करायचा नाही, या न्यायाने जुनी दुःखे विसरली जातील आणि मनात आनंदाचे इंद्रधनुष्य उमलण्यास सुरुवात झालेली असेल. सृष्टीत वर्षारंभी असे होत असते; मानवी जीवनातही तेच घडते!
Related
Articles
यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस
02 Apr 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
वाचक लिहितात
28 Mar 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस
02 Apr 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
वाचक लिहितात
28 Mar 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस
02 Apr 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
वाचक लिहितात
28 Mar 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
यंदा सर्व नक्षत्रांत समाधानकारक पाऊस
02 Apr 2025
गडचिरोली जिल्ह्यासाठी खनिकर्म प्राधिकरण
02 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
वाचक लिहितात
28 Mar 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
नेताजींचे सहकारी - अबद खान
28 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत