भारतीय संस्कृतीचे संघामुळे रक्षण   

पंतप्रधान मोदींचे उद्गार, माधव नेत्रालयाचा शिलान्यास

नागपूर : भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यात आणि देशाच्या आधुनिकीकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोलाची भर घातली असून संघ संस्कृतीचा वटवृक्ष नव्हे तर अक्षय वट ठरल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले.
 
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या इमाातीचा शिलान्यास काल झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संघाचे माजी सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी, गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले,गुलामीची मानसिकता आणि गुलामीची प्रतीके मागे टाकून भारत वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्याय संहिता लागू झाली आहे. वसुधैव कुटुंबकम मंत्राने जग देशाच्या अगदी जवळ येत चालले आहे. संघाचे स्वयंसेवक देशभर नि:स्वार्थपणे कार्य करत आहेत. भारताच्या अक्षय संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा संघ एक वटवृक्ष नसून तो आता कार्याने अक्षय वट झाला आहे. ते म्हणाले, संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या स्मृतीनिमित्त २०१४ मध्ये माधव नेत्रालयाची स्थापना झाली होती.  
 
गेली अनेक दशके नेत्रालयाने अनेकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे. नवीन प्रकल्पातून अनेकांना नवी दृष्टी प्राप्त होणार आहे. सरकारचे धोरणही गरिबांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी, असेच आहे. भाजपच्या राजवटीत एम्सची संख्या तिप्पट वाढली आहे. सरकार अधिकाधिक दर्जेदार डॉक्टर निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या माध्यमातून रुग्णसेवेचा लाभ अनेकांना घेता येईल, असे प्रयत्न केले जातील. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेतून अनेक ज्येष्ठांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाला आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना मोदी म्हणाले, संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असतााना कार्य पाहता संघात तपस्या, संघटन आणि समर्पण अशीच भावना अधिक दिसली. २०४७ मध्ये विकसित भारताचे लक्ष्य गाठताना त्याची प्रचिती येईल. 

हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला वंदन 

भाषणाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या मराठीत शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला त्यांनी भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. यापूर्वी पंतप्रधानपदी असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी २७ ऑगस्ट २००० मध्ये नागपूरला भेट दिली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रथमच रेशीमबागेला भेट दिली आहे. 
 

Related Articles