सेमी क्रायोजेनिक इंजिनाची इस्रोकडून यशस्वी चाचणी   

अवकाश यान मार्क - ३ साठी वापर होणार 

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सेमी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात यश मिळविले  आहे. त्या अंतर्गत इंजिनाची घेतलेली चाचणी अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्याचा दावा केला, त्याचा वापर प्रक्षेपण अवकाश यान मार्क -३ साठी (एलव्हीएम -३) साठी केला जाणार आहे. 
 
सेमी क्रायोजेनिक इंजिन किंवा द्रवरूप प्राणवायू/ केरोसिन इंजिनाचा वापर करुन २ हजार किलोन्यूटन वेगाने एलव्हीएम -३ चे अवकाशात प्रक्षेपण करता येणार आहे. असे इंजिन विकसित करण्यात २८ मे रोजी इस्रोने यश मिळविल्याचा दावा केला आहे. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपाल्शन संकुलात इंजिन पॉवर हेड चाचणी अति उच्च तपमानात घेण्यात आली. इंजिनाचे सावकाश प्रज्वलन आणि उड्डाणाची चाचणी सुमारे अडीच सेकंद घेण्यात आली. चाचणीचे निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे आल्याच दावा इस्रोने केला. बंदिस्त वातावरणात घेतलेली चाचणी यशस्वी झाली. गुंतागुंतीच्या चाचणीत प्रज्वलन पूर्व, टर्बो पंप, इंजिन सुरू करण्याची यंत्रणा आणि नियंत्रण उपकरणे आणि प्रत्यक्ष प्रज्वलनानंतर उच्च तपमानात अडीच सेकंद चाचणी घेतली.
 
भविष्यात सेमी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर अवकाश यानाच्या प्रक्षेपणासाठी केला जाणार आहे. सध्या वापरण्यात येणार्‍या केंद्रीय द्रवरूप इंधनावर  चालणार्‍या इंजिनाची ते जागा घेणार आहे. विषारी आणि धोकादायक नसलेले प्राणोदक अर्थात द्रवरूप प्राणवायू आणि शुद्ध केरोसिनचा इंधन म्हणून त्यात वापर केला आहे. त्यामुळे अधिक वेगाने यानाला प्रक्षेपित करणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. यानाची क्रायोजेनिक पातळी गाठण्यासाठी या इंजिनाचा वापर करता येणार आहे. चार ते पाच टन वजन वाहून नेण्याची क्षमताही प्राप्त होणार आहे. वजनी भाग पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवता येणे शक्य होणार आहे. 

सेमी क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय ?

क्रायोजेनिक इंजिनाप्रमाणे सेमी क्रायोजेनिक इंजिन कार्य करते .क्रायोजेनिक इंजिनात द्रवरूप हैड्रोजनचा वापर केला जातो.  सेमी क्रायोजेनिक इंजिनात द्रवरूप हैड्रोजन ऐवजी शुद्ध केरोसिनचा आणि द्रवरूप प्राणवायूचा वापर केला जातो. द्रवरूप प्राणवायू प्रज्वलनाला चालना देते.  शुद्ध केरोसिन वजनाला हलके असते. तसेच ते सामान्य तपमानात साठवून देखील ठेवता येते.
 

Related Articles