भूकंपबळींची संख्या एक हजारांवर   

बँकाक : म्यानमारमधील भूकंपबळींची संख्या १ हजारांवर पोहोचली आहे. तर, सव्वादोन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारतासह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 
 
म्यानमारला शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ नोंदवली गेली. त्यानंतर, दहा मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता ६.४ इतकी होती. पहिला भूकंप इतका शक्तिशाली होता की, त्याचे झटके शेकडो किलोमीटर दूरवरील थायलंडला जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सांगाइंग शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर भूगर्भात १० किलोमीटर खोलवर होता. म्यानमार आणि थायलंडसह भारत, चीन, तैवान आणि बांगालादेशालाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.थायलंडच्या बँकाकमधील अनेक इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या. काही इमारतींवर जलतरण तलाव होते. भूकंपाच्या धक्क्याने त्यातील पाणी धबधब्याप्रमाणे कोसळत होते. एक ३२ मजली निर्माणाधीन इमारत कोसळली. धुळीचे लोट कित्येक फुटापर्यंत दिसत होते.
 
म्यानमारमध्ये सध्या लष्करी राजवट आहे. म्यानमारच्या लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान स्यू की यांच्याकडून सत्ता हस्तगत केली होती. म्यानमारच्या लष्कराच्या निवेदनानुसार, आतापर्यंत १ हजारांहून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भूकंपात २,३७६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्यानमारला बर्मा देखील म्हटले जाते.
 
भूृकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. कित्येक घरांना तडे गेले. पूल कोसळले. रस्त्यांना भेगा पडल्या. विजेचे खांब आणि अनेक दूरध्वनी टॉवर्स कोसळले आहेत. त्यामुळे अनेक भागात वीज, टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद आहे. अनेक सरकारी कार्यालयांनादेखील भूकंपाचा तडाखा बसला आहे. थायलंडमध्ये भूकंपाने १० जणांचा बळी घेतला आहे. तर, २६ जण जखमी झाले आहेत. याशिवाय, ४६ जण अद्याप बेपत्ता आहेत.
 

Related Articles