नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक   

काठमांडूतील संचारबंदी मागे

काठमांडू : नेपाळमध्ये राजेशाही परत आणा, या मागणीसाठी आंदोलन करणार्‍यांपैकी १०० जणांना मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी अटक केली आहे. तसेच राजधानी काठमांडूच्या पूर्व भागातील संचारबंदी हटविण्यात आली आहे.
 
आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात निदर्शनावेळी झटापट झाली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी परिसरात संचारबंदी लागू केली होती. ती आता काल मागे घेण्यात आली आहे. तिनकुने परिसरात हिंसक निदर्शने झाली होती तेव्हा जमावाने दगडफेक केली होती. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला होता. वाहने पेटविली आणि दुकानांची लुटालूट केली. हिंसाचारात दोन जण ठार झाले. त्यात एका दूरचित्रवाणीचा कॅमेरामन होता. यानंतर लष्कराने कडक कारवाई करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार नंतर संचारबंदी लागू केली होती. ती काल सकाळी सात वाजता उठवण्यात आली. या संदर्भातील आदेश काठमांडू  जिल्हा प्रशासनाने दिले होते. घराची आणि वाहनांची जाळपोळ केल्या प्रकरणी  पोलिसांनी एकूण १०५ जणांना अटक केली होती. आंदोलक राजेशाही परत आणा आणि देशाला हिंदूराष्ट्र घोषित करा, अशी मागणी करत आहेत. आंदोलकांचे समन्वयक दुर्गा प्रसाई यांनी आंदोलनस्थळावरील बॅरिकेड्स तोडले, बुलेटप्रूफ मोटारीतून बनेश्वर येथील संसदेच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यामुळे आंदोलन अधिकच हिंसक बनले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे सरचिटणीस धवल समशेर राणा आणि केंद्रीय सदस्य रवींद्र मिश्रा यांच्यासह अन्य जणांचा समावेश आहे. हिंसक अंदोलनाला प्रसाई यांना पोलिसांनी दोषी ठरविले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अपिल बोहरा यांनी दिली. पोलिसांच्या मते ५३ पोलिस कर्मचारी, लष्करी पोलिस दलाचे २२ आणि ३५ आंंदोलक जखमी झाले. निदर्शनादरम्यान १४ इमारतींना आग लावली होती. ९ इमारतींची नासधूस जमावाने केली. ९ सरकारी आणि सहा खासगी वाहने पेटविली. कांतीपूर येथील दूरचित्रवाणी केंद्राच्या इमारतीवर आणि तिनकुनी परिसरातील अनुपमा मीडिया हाऊसवर जमावाने हल्ला केला.

नेपाळमधील घटनाक्रम

नेपाळमध्ये २४० वर्षांपासून राजेशाही राजवट सुरू होती.
नेपाळ २००८ पर्यत जगातील एकमेव हिंदूराष्ट्र होते.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत २००८ मध्ये लोकशाही स्थापन केली.
धर्मनिरपेक्ष, संघराज्य आणि लोकशाही प्रजासत्ताक राज्य स्वीकारले.
नेपाळचे माजी नरेश ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांनी १९ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी पुन्हा राजेशाही आणा, या मागणीला समर्थन देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली.
ज्ञानेंद्र यांचे पोखरा येथून त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ मार्च रोजी आगमन झाले. त्यांनी विविध धार्मीक स्थळांना भेटी दिल्या होत्या. तेव्हा राजेशाही समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी एक मेळावा आयोजित केला होता.
राजेशाही लागू करण्याची आणि नेपाळला पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित करण्याच्या मागणी वाढली. त्यासाठी निदर्शने आणि आंदोलने सुरू झाली. 
 

Related Articles