मास्क घालून मुले खेळत असतील तर धोकादायक   

प्रदूषणावर न्यायाधीश नाथ यांची चिंता

नवी दिल्ली  देशातील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ यांनी शनिवारी सरकरचे लक्ष वेधले. प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावीत आणि हरित तंत्रज्ञात गुंतवणूक अधिक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले,.प्रदूषणाच्या छायेत मुले मास्क घालून खेळत असतील ते स्वीकारता येणार नाही.
 
विज्ञान भवन येथे पर्यावरण विषयक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  न्यायाधीश विक्रम नाथ यांनी वाढत्या प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. आर्थिक विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन असावे. पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकारने हरित तंत्रज्ञानाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, राजधानी नवी दिल्लीचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. ते मुलांसाठी धोकादायक आहे. मास्क घालून मुले खेळत असतील तर ते स्वीकारता येणार नाही. आताच अशी परिस्थिती असेल तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे ? याची कल्पना करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज आहे. आर्थिक विकासाबरोबर शुद्ध श्वास तितकाच महत्त्वाचा आहे. नद्यांचे प्रदूषण अधिक चिंताजनक आहे. कचरा टाकून त्या प्रदूषित केल्या जात आहे. ही गंभीर बाब आहे. असेच सुरू राहिले तर शुद्ध पाणी मिळणे अवघड होईल.  त्यामुळे नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवावी. पाणी शुद्ध व्हावे, यासाठी कठोरपणे पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.
 

Related Articles